सय्यद अली दुजाना गुरदेजी यांचा ‘चॅम्पियन जस्टिस अँड पीस अवॉर्ड’ने गौरव
लोकमानस प्रतिनिधी -
मुंबई : ‘बिलियनेअर्स फॉर पीस कॉन्क्लेव्ह 2026’मध्ये अजमेर शरीफ दर्ग्याचे केअरटेकर सय्यद अली दुजाना गुरदेजी यांना ‘आय अॅम पीसकीपर – चॅम्पियन जस्टिस अँड पीस अवॉर्ड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शांतता, मानवता, आध्यात्मिक एकात्मता आणि सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जगभरातील नेते, राजनैतिक प्रतिनिधी, समाजसेवक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला. अजमेर शरीफ दर्ग्याची परंपरा आणि ख्वाजा गरीब नवाज (र.अ) यांच्या शिकवणीचे प्रतिनिधित्व करताना सय्यद अली दुजाना गुरदेजी यांनी करुणा, सर्वधर्म समभाव आणि मानवसेवेचा संदेश दिला. सूफी विचारसरणी प्रेम, शांतता, सहअस्तित्व आणि बंधुभाव शिकवते, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान त्यांनी अभिनेते व समाजसेवक सोनू सूद, ज्येष्ठ अभिनेते बोमन इराणी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा,अभिनेते जावेद जाफरी, ज्येष्ठ अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी , अभिनेत्री रुपाली गांगुली, तसेच मॉरिशसच्या माजी राष्ट्राध्यक्षा अमीनाह गुरीब फकीम यांच्यासह अनेक मान्यवरांशी संवाद साधला.
तसेच वोकहार्ट फाऊंडेशनच्या प्रतिनिधींशीही त्यांनी चर्चा केली. या संवादातून शांततामय आणि अधिक दयाळू जग निर्माण करण्याच्या सामूहिक दृष्टिकोनाला बळ मिळाल्याचे सांगण्यात आले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर सय्यद अली दुजाना गुरदेजी यांनी एकता, परस्पर आदर, दयाळूपणा आणि निःस्वार्थ मानवसेवा यांद्वारेच खरी शांतता प्रस्थापित होऊ शकते, असे मत व्यक्त केले. सूफी विचारसरणी आजही जगभरातील लाखो लोकांना सौहार्द आणि करुणेची प्रेरणा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘बिलियनेअर्स फॉर पीस कॉन्क्लेव्ह 2026’ हा कार्यक्रम नेतृत्व, शांतता आणि मानवतेचा जागतिक उत्सव ठरला. जगाला अधिक एकसंघ आणि शांततामय बनवण्यासाठी कटिबद्ध असलेल्या प्रभावशाली व्यक्तींना या मंचाने एकत्र आणले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा