राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब
नफीसा गिरकर-
राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील चार नावांची घोषणा केली. पक्षाने यामध्ये धक्का तंत्राचा वापर केल्याचे दिसून आले.राज्यसभेच्या उमेदवारी बाबत कोणत्याही चर्चेत नसलेल्या दोन नावांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे. तर त्यापैकी दोन नावे चर्चेतील आहेत.
भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील विद्यमान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यासोबत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना देखील खासदारकीचे तिकीट दिले आहे.
या यादीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य रामराव वडकुते यांना राज्यसभेची लॉटरी लागली आहे.
भाजपच्या चार जागांसाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच होती राज्यसभेतून निवृत्त होत असलेले धैर्यशील पाटील व भागवत कराड हे सदस्य व माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, माजी खासदार डॉ प्रीतम मुंडे, यांच्यासह अनेकांची नावे राज्यसभेसाठी चर्चेत होती. मात्र भाजपने धक्का तंत्राचा वापर करत चर्चेतल्या नावांवर काट मारत चर्चेत नसलेल्या उमेदवारांना मोठी संधी दिली आहे.
माया इवनाते नागपूरच्या माजी महापौर असून नुकत्याच झालेल्या नागपूर महापालिकेच्या निवडणुकीच्या नगरसेविका म्हणून पुन्हा निवडून आल्या आहेत. त्यांनी राष्ट्रीय अनुसूचित आयोगावर काम केले असून विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निकटवर्तीय म्हणून त्या ओळखल्या जातात.त्यामुळे भाजपने आदिवासी महिलेला महाराष्ट्रातून राज्यसभेवर संधी देत एक नवीन राजकीय खेळी केली आहे.
तर, रामराव वडकुते हे राष्ट्रवादी काँग्रेसची माजी विधान परिषद आमदार असून धनगर समाजाचे नेते आहेत. त्यांना भाजपने राज्यसभा संधी देत धनगर समाजातील नवीन नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. वडकुते यांनी अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळावर काम केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून हिंगोली विधानसभेची निवडणूक त्यांनी 2004 मध्ये लढवली होती मात्र त्यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादीने त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती केली होतीविधानपरिषदेची मुदत संपल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रलेश केला होता. वडकुते यांच्या रुपाने हिंगोलीला राज्यसभेत प्रतिनिधित्व मिळणार आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत पाच मार्च असून अर्जाची छाननी सहा मार्चला होईल.अर्ज मागे घेण्याची मुदत नऊ मार्चपर्यंत असून मतदान 16 मार्चला व मतमोजणी 16 मार्चला सायंकाळी पाच वाजल्यापासून होईल.
महाराष्ट्रातून निवृत्त होत असलेले राज्यसभा सदस्य पुढील प्रमाणे
शरद पवार व फौजिया खान (राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्ष)
रामदास आठवले (रिपब्लिकन पक्ष)
रजनी पाटील (काँग्रेस)
प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना उबाठा)
धैर्यशील पाटील व भागवत कराड (भाजप)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा