दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी


नफिसा गिरकर :  राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज करण्याची मुदत गुरुवारी संपत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राज्यसभेसाठी इच्छुक दिग्गज उमेदवारांना डावलून नव्या नेतृत्वाला राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.


शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून काम करणाऱ्या शिवसेनेचा आक्रमक आणि अभ्यासू चेहरा म्हणून ओळख निर्माण केलेल्या प्राध्यापक डॉ. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. डॉ.वाघमारे या सोलापूर जिल्ह्यातील असून मागील पंधरा वर्षांपासून सामाजिक आणि आर्थिक राजकीय क्षेत्रात सक्रियपणे काम करत आहेत.


 शिवसेनेतून राज्यसभेवर जाण्यासाठी माजी खासदार राहुल शेवाळे, प्रवक्त्या शायना एन सी,  माजी केंद्रीय मंत्री आनंद अडसूळ,माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्यासह अनेक जण इच्छुक होते. मात्र, या सर्वांना बाजूला सारत एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. 


शिवसेनेतील उठावानंतर ज्योती वाघमारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा स्वीकार करत एप्रिल 2023 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. सध्या त्यांच्याकडे शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या आणि धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख ही जबाबदारी आहे.  एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेतृत्वावर टीका करण्याचा विरोधकांना त्यांच्याच भाषेत किंवा त्याहून अधिक परखड व सडेतोड उत्तरे देण्यामध्ये वाघमारे यांचे नाव घेतले जाते. दसरा मेळाव्यात त्यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे,संजय राऊत,सुषमा अंधारे यांच्यावर  टीका केली होती.

असा धडाकेबाज चेहरा खासदार झाल्यास सोलापूर जिल्हा व पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना विस्तारासाठी फायदा होईल असा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

वाघमारे या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्या असून त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पॅंथरचे कार्यकर्ते होते व सोलापूर महापालिकेत त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले आहे ज्योती वाघमारे यांनी मानवी हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतिक चळवळ,आंबेडकर चळवळ यातूव  आपल्या कामाला सुरुवात केली. मराठी,इंग्रजी,हिंदी,तेलगू आणि कन्नड या पाच भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. इंग्रजी साहित्यात पीएचडी केलेल्या वाघमारे यांनी दहा वर्षाहून अधिक काळ प्राध्यापिका म्हणून काम केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब