बांग्लादेशी एबी बँकेकडून कर्करोग उपचार व संशोधनासाठी ४० लाखांची मदत


— भारत-बांग्लादेश आरोग्य सहकार्याला चालना
नफिसा गिरकर - 
मुंबई : बांग्लादेशच्या मुंबईतील उप-उच्चायुक्त फरहाना चौधरी यांच्या उपस्थितीत एबी बँक पीएलसी, मुंबई शाखेकडून कर्करोग उपचार व संशोधनासाठी ४० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. हा निधी टाटा मेमोरियल सेंटरअंतर्गत नवी मुंबईतील ‘अॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर’ (ACTREC) यांना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांतर्गत प्रदान करण्यात आला.

एबी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दरायूस बजान व वरिष्ठ उपाध्यक्ष मोहम्मद अबुल कलाम आझाद यांनी टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला. या निधीतून अत्याधुनिक संशोधन उपकरणांची खरेदी, कर्करोगावरील आण्विक व ट्रान्सलेशनल संशोधनाला चालना, तसेच निदान व उपचारांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे.

यावेळी डॉ. सुदीप गुप्ता यांनी टाटा मेमोरियल सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक उपचार सुविधांची माहिती दिली. नवी मुंबईतील ACTREC केंद्रात प्रोटॉन थेरपी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून, तुलनेने परवडणाऱ्या दरात उपचार दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

उप-उच्चायुक्त फरहाना चौधरी यांनी हा उपक्रम भारत-बांग्लादेश आरोग्य सहकार्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे नमूद केले. एबी बँकेच्या अधिकाऱ्यांनीही टाटा मेमोरियल सेंटरच्या सेवांचे कौतुक करत या उपक्रमाला मानवतावादी योगदान असल्याचे सांगितले.
मुंबईत कार्यरत असलेली एबी बँक ही एकमेव बांग्लादेशी बँक असून, ती आर्थिक सेवांसोबतच उपचारासाठी मुंबईत येणाऱ्या बांग्लादेशी रुग्णांना मदत करते. हा उपक्रम दोन्ही देशांमधील आरोग्य क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट करणारा ठरणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब