मातृछाया - एक अमूल्य बंध
मातृछाया - एक अमूल्य बंध
- सौ. ऋतुजा तिर्लोटकर
----------
मातृछाया - अर्थात मायेची सावली - एक उबदार घरटे - जिथे एखाद्या मायाळू आई प्रमाणे आमच्या लाडक्या लेकरांची काळजी घेतली जाते. त्यांना आपल्या नातवंडांप्रमाणे भरभरून प्रेम केले जाते.
आपण बोलत आहोत, ज्योती ताई जाधव यांच्या, विलेपार्ले येथील प्रख्यात मातृछाया पाळणा घराबद्दल !! ज्योती ताई या तेथील कुटुंब प्रमुख तथा सर्वेसर्वा आहेत.
मातृछायाची खासियत अशी आहे की लोकांसाठी जरी हे पाळणाघर असले तरी तिथे येणार्या प्रत्येक चिमुकल्यांसाठी एक हक्काचे घर आहे, जिथे ते मनसोक्त खेळतात, बागडतात, मस्ती करतात अणि त्यांच्या कुटुंबाचे जणू एक सदस्यच बनून जातात !!
ज्योती ताईच्या या उदात्त कार्याला नुकतीच 15 वर्षे पूर्ण झाली. या पंधरा वर्षांत त्यांनी 300 हून अधिक मुलांना सांभाळले, त्यांना फुलासारखे जपले. त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
मातृछाया हा त्यांच्यासाठी फ़क्त एक व्यवसाय नाही आहे तर ही एक पुजा आहे. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. तसेच लहान मुले म्हणजे देवाघरची फुले. अणि या फुलांना जपायचे म्हणजे देवाचे काम. असे एक काम ज्यात एक आगळेच समाधान आहे, सुख आहे, जे शब्दांत न मांडता येणारे आहे.
सामाजिक बांधिलकी हा हेतू उराशी बाळगून, माणुसकीच्या नात्याने समाजाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवून ज्योती ताईंनी आपल्या राहत्या घरात मातृछाया पाळणाघर सुरू केले.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात, अनेक पालक आहेत की जे दोघेही नोकरी करतात, घरी मुलांची काळजी घेण्यासाठी कुणी नाही अश्या पालकांना ज्योती ताईंनी मातृछायाच्या माध्यमातून उत्तम तोडगा दिला.
ज्योती ताई जितक्या मायाळू आहेत तितक्याच त्या शिस्तप्रिय देखील आहेत. त्यांच्या कपाटावर एक छडी ठेवलेली असते. छडी वापरण्याची गरजच पडत नाही त्यांना. नुसती काढून हातात घेतली तरी मुले वठणीवर येतात. सर्व मुलांना त्यांचा धाक असतो.
सर्व मुले त्यांना काकी अशी हाक मारतात. त्याच्या घरात बनवलेल्या तसेच बाहेरून आणलेल्या प्रत्येक खाऊ मध्ये या मुलांचा वाटा असतो. काकींप्रमाणे काका देखील या मुलांवर तितकीच माया करतात, त्यांची काळजी घेतात. मुलांना रोज पोषक आहार दिला जातो.
ज्योती ताईंचे कर्तृत्व अधोरेखित करण्यासाठी येथे मला एखाद्या पाल्याच्या पालकांचा संदर्भ देणे समर्पक वाटते. इतर कुणी कशाला? मी स्वतः एक पालक प्रतिनिधी म्हणून माझे वैयक्तिक मत मांडू इच्छिते.
माझा दक्ष दीड वर्षांचा होता तेव्हा पासून मला नाईलाजाने त्याला पाळणाघरात ठेवावे लागले. घरी वयोवृद्ध सासू सासरे - त्यांना दक्षची जबाबदारी पेलण्यासारखी नव्हती. सुरुवातीला खूप त्रास झाला. त्याला पाचव्या माळ्यावर सोडल्यावर डोळे अश्रूंनी ओसंडून वाहायचे. मन हळूच म्हणायचे. देवा काय वेळ आली माझ्यावर, माझ्या सोन्यासारख्या पोटच्या पोराला दिवसभर दुसर्याच्या हातात सोपवायचे. एक आई म्हणुन मला रोज हरल्यासारखे वाटायचे.
पण हळू हळू सर्व बदलले. दक्ष मोठा होत गेला. लहान असूनही त्याने आम्हाला समजून घेतले. मम्मी - पप्पा आपल्या चांगल्या साठीच पाळणाघरात सोडतात, हे त्याने स्विकारले.
त्यांच्या कडे आल्यानंतर दक्षला शिस्त लागली. तो स्वतःच्या हाताने जेवू लागला. इतर मुलांमध्ये तो मिसळू लागला. आपले मत व्यक्त करू लागला. आता त्यांचा 10-12 मित्र मैत्रिणींचा छानसा ग्रुप बसला आहे. ते एकमेकांशी खेळतात बागडतात, भांडतात. ज्योती ताई दक्ष सारख्या अनेक मुलां साठी जणू देवकी स्वरुप ठरल्या आहेत.
आज ज्योती ताई आहेत म्हणुन आम्ही बिनधास्त ऑफिसला जाऊ शकतो. त्या नसत्या तर आमच्या संसाराचं गणितच चुकले असते. चूल अणि मुल याच साच्यात बसावे लागले असते. त्यामुळे मातृछाया हे आमच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनले आहे. तिथे मुलांना सोडले की मुले शाळेत सुद्धा तिथूनच जातात. मातृछायामध्ये मुले सुरक्षित असतात. त्यांच्या बद्दल कोणतीही चिंता आमच्या मनात नसते. आमच्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक यशस्वी वाटचालीत खारीचा वाटा उचलणाऱ्या ज्योती ताईंचे आम्ही शतशः ऋणी आहोत.
एक पालक प्रतिनिधी म्हणून ज्योती ताई जाधव यांच्या या उदात्त कार्या बदल आम्हा पालकांतर्फे कोटी कोटी प्रणाम अणि कोटी कोटी धन्यवाद !!
स्वतःसाठी तर सगळेच जगतात, पण खरा माणूस तोच जो दुसऱ्यांसाठी जगतो. ईश्वर चरणी एकच प्रार्थना करते, आमच्या ज्योती ताई यांचे मातृछाया हे घरकुल सदैव सौख्याने, आनंदाने गजबजलेले राहो. आमच्या लेकरांवर असलेली त्यांची माया अशीच कायम राहो. लहान मुलांबद्दल आवड अणि सामाजिक बांधिलकी यातील दुवा साधत पंधरा वर्षांत ज्योती ताईंनी समाजाप्रती दिलेल्या या अमूल्य योगदाना बदल त्यांना मानाचा मुजरा !!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा