भारत हा केवळ शेजारी देश नसून विश्वासू मित्र- फरहाना चौधरी- बांगलादेशचा स्वातंत्र्य दिन व राष्ट्रीय दिन उत्साहात साजरा


नफिसा गिरकर : (मुंबई) - भारत हा बांगलादेशाचा केवळ शेजारी देश नसून विश्वासू मित्र आहे. दोन्ही देशांमध्ये सुमारे ४००० किमी सीमा असून दोन्ही देशातील परस्पर संबंध तळागाळापर्यंत पोहोचले आहेत, असे बांगलादेशच्या मुंबईतील उप-उच्चायुक्त फरहाना चौधरी म्हणाल्या. बांगलादेशचा स्वातंत्र्याचा ५५ वा वर्धापनदिन नुकताच मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. राज्य सरकारचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 
फरहाना चौधरी म्हणाल्या, हा दिवस केवळ राष्ट्रनिर्मितीचा नसून स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शहीदांचे स्मरण करण्याचा आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात भारतीय सैनिकांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. २०२४-२५ या कालावधीत दोन्ही देशांतील व्यापार सुमारे १२ बिलियन यूएस डॉलर्सपर्यंत पोहोचल्याची माहिती देत, द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नवनिर्वाचित नेतृत्व आणि विश्वासू भागीदारीचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले. या समारंभात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बांगलादेशी विद्यार्थिनींनी समूह नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच फरहाना चौधरी यांनी रविंद्रसंगीत सादर करून कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगत वाढवली.
राज्य सरकारचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे म्हणाले, भारत व बांगलादेशाचे संबंध ऐतिहासिक असून दोन्ही देशांमध्ये एकमेकांना जोडणाऱ्या विविध बाबी आहेत. दोन्ही देशांचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी रचले असल्याचा उल्लेख करत, संगीत, अन्नसंस्कृती, क्रिकेट यांसारख्या अनेक बाबी दोन्ही देशांना जोडतात, असे  
ते म्हणाले.  

गवांदे यांनी भाषणात  भारत आणि बांगलादेश यांच्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक नात्यांवर प्रकाश टाकला. मुक्तीवाहिनीच्या काळापासून दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ असून ‘मैत्री’ रेल्वे सेवेसारख्या उपक्रमांमुळे परस्पर संबंधांना चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रात बांगलादेशातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. बांगलादेशच्या मुंबईतील उप उच्चायुक्त फरहाना चौधरी व मोहम्मद शफिउल्लाह यांच्या वतीने यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

या कार्यक्रमाला इराकचे वाणिज्यदूत जुहेर साद अब्बास, श्रीलंकेच्या वाणिज्यदूत प्रियंगा विक्रमसिंघे, इजिप्तच्या उप वाणिज्यदूत डिना अल्बाहे यांच्यासह विविध देशांचे राजनैतिक प्रतिनिधी उपस्थित होते. या समारंभात राजनैतिक अधिकारी, भारतीय नौदलाचे सेवानिवृत्त अधिकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच मुंबईतील बांगलादेशी समुदाय मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब