कझाकस्तानचे राष्ट्रपती टोकायेव यांचा गल्फ देशांना पाठिंबा- लष्करी कारवायांचा निषेध
नफिसा गिरकर : कझाकस्तानचे राष्ट्रपती कासिम जोमार्ट टोकायेव यांनी गल्फमधील पाच देशांच्या नेत्यांना वैयक्तिक संदेश पाठवत सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत त्या देशांच्या जनतेशी ऐक्य आणि ठाम पाठिंबा व्यक्त केला आहे. ही माहिती नवी दिल्ली येथील कझाकस्तानचे राजदूत अझमत येस्कारायेव यांनी दिली.
राजदूत येस्करायेव यांनी सांगितले की, राष्ट्रपती टोकायेव यांनी युएई, सौदी अरेबिया, कतार, बहरिन, कुवैत या देशांच्या नेतृत्वाला वैयक्तिक संदेश पाठवले. या संदेशांमध्ये त्यांनी संबंधित देशांच्या सार्वभौमत्व, सुरक्षा आणि स्थैर्याला कझाकस्तानचा पूर्ण पाठिंबा असल्याचे नमूद केले.
मैत्रीपूर्ण आणि बंधुत्वाच्या देशांच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचवणाऱ्या कोणत्याही लष्करी कारवायांचा कझाकस्तानने तीव्र निषेध केला आहे. आंतरराष्ट्रीय प्रश्न आणि सशस्त्र संघर्ष हे केवळ राजनैतिक मार्गाने आणि संवादातूनच सोडवले जावेत, ही कझाकस्तानची स्पष्ट भूमिका असल्याचे राष्ट्रपती टोकायेव यांनी आपल्या संदेशात अधोरेखित केले.
“आमचा देश सर्व गुंतागुंतीचे आंतरराष्ट्रीय प्रश्न आणि सशस्त्र संघर्ष केवळ राजनैतिक मार्गाने सोडवण्याचा सातत्याने पुरस्कार करतो,” असे टोकायेव यांनी नमूद केले.
तसेच, कझाकस्तान हे बंधुत्वाच्या अरब देशांना आवश्यक ती कोणतीही मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या देशांच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत नियमित संपर्क आणि सहकार्य पुढेही सुरू राहील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
नवी दिल्लीतील कझाकस्तानच्या दूतावासामार्फत ही माहिती देण्यात आली असून, सध्याच्या प्रादेशिक परिस्थितीत कझाकस्तानने गल्फ देशांसोबत आपले ऐक्य आणि सहकार्य पुन्हा अधोरेखित केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा