महाविकास आघाडीचा राज्यसभेचा उमेदवार निश्चित, काँग्रेसकडून पाठिंबा जाहीर


नफिसा गिरकर - मुंबई : राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड झाली असून महाविकास आघाडीच्या वाट्याला आलेल्या एका जागेसाठी उमेदवाराचे नाव निश्चित झाले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या उमेदवारीला काँग्रेस पक्षाने अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.   काँग्रेसचे  प्रदेशअध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.


 महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा होऊन हा निर्णय एकमताने घेण्यात आल्याची माहिती सपकाळ यांनी दिली.


मुंबईतील गांधी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुले यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या बैठकीस काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यावेळी उपस्थित होते.

 

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “राज्यसभेची उमेदवारी काँग्रेस पक्षाला मिळावी अशी आमची अपेक्षा होती. मात्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते रागुल गांधी, तसेच राष्ट्रीय सरचिटणीस के सी वेणूगोपाल  यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सपकाळ म्हणाले. 


खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे आभार मानले. “राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांवर प्रभावी आवाज म्हणून शरद पवार यांचे अनुभव राज्यसभेत महत्त्वाची भूमिका बजावतील,” असे त्यांनी नमूद केले. राज्यसभेच्या या निवडणुकीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, आगामी दिवसांत इतर जागांसाठीही राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील एकजूट कायम असल्याचा संदेश या निर्णयातून देण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब

शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शानू पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल