वरळीत गुढीपाडव्याचा सांस्कृतिक जल्लोष; भव्य शोभायात्रा आणि ‘मराठी शाळा’ रील स्पर्धा आकर्षण
नफिसा गिरकर -
हिंदू नववर्षाचे स्वागत पारंपरिक उत्साहात आणि मराठमोळ्या थाटात करण्यासाठी वरळी परिसरात भव्य गुढीपाडवा शोभायात्रा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. शिवसह्याद्री फाउंडेशन आणि ‘आम्ही वरळीकर’ या संकल्पनेतून आयोजित या शोभायात्रेचे यंदा सोळावे वर्ष असून ती अधिक भव्य आणि आकर्षक करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वरळीतील सामाजिक संस्था, मंडळे, ट्रस्ट, सर्व राजकीय संघटना तसेच नागरिकांनी सहकुटुंब या शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ही शोभायात्रा गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता जांबोरी मैदान, डॉ. जी. एम. भोसले मार्ग, वरळी येथून प्रारंभ होणार आहे. मान्यवरांच्या हस्ते गुढी उभी करून,विश्वशांती प्रार्थना व शालेय विद्यार्थ्यांच्या सामूहिक महाराष्ट्र गीतांनी शोभायात्रेची सुरुवात होणार असून पारंपरिक वाद्यांचा गजर, मर्दानी खेळ, जव्हार येथिल तारफा नृत्य,आकर्षक गुढ्या आणि विविध सांस्कृतिक देखावे यामुळे वातावरण उत्साहाने भारावून जाणार आहे.
याशिवाय ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचा भव्य चित्ररथ, बाईक रॅली, साई पालखी सोहळ्याची मिरवणूक, वारकरी भक्तिमय गजर, लेझीम पथक आणि भव्य ढोल पथक या आकर्षणांमुळे शोभायात्रेला विशेष रंगत येणार आहे.
जागतिक महिला दिनाचा सन्मान म्हणून यंदाची गुढी विभागातील प्रमुख महिलांच्या हस्ते उभारण्यात येणार आहे. तसेच मराठी भाषा आणि मराठी शाळांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘मराठी शाळा’ या विषयावर भव्य रील स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत विजेत्यांना ५० हजार रुपयांहून अधिक रोख पारितोषिके व सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत.
“आपली शाळा , आपली भाषा; प्रगतीची नवी आशा…
मराठी शाळा ज्ञानाचा मळा; संस्कृतीचा वाढवू लळा…
मराठीचा अभिमान , शिक्षणातून सन्मान” या संदेशातून मराठी भाषा आणि संस्कृतीचा अभिमान जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात येणार आहे. तसेच यंदाचे वर्ष हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष मानाचे असल्याने त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन अभिवादन करण्यात येणार आहे.
सर्व नागरिकांनी पारंपरिक मराठमोळ्या वेशात, डोक्यावर फेटे परिधान करून आणि भगवा ध्वज घेऊन या शोभायात्रेत सहभागी व्हावे व हिंदू नववर्षाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन शिवसह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. संजय शंकर कदम आणि सरचिटणीस श्री. महेश खवणेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी शिव सह्याद्री वरळी फेसबुक वर अथवा या ८८७९१११११८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा