टोरेंट पॉवरच्या दावत-ए-इफ्तारला उत्स्फूर्त प्रतिसाद
नफिसा गिरकर (मुंब्रा) : पवित्र रमजान महिन्यानिमित्त सामाजिक एकता आणि सौहार्दाचा संदेश देण्यासाठी टोरेंट पॉवर कंपनीतर्फे दावत-ए-इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. शीळ- मुंब्रा कौसा परिसरातील नागरिकांसाठी कौसा येथील डायमंड बँक्वेट हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या इफ्तार कार्यक्रमाला शहरातील सुमारे ३०० हून अधिक मान्यवर उपस्थित होते. विविध पोलीस ठाण्यांमधील अधिकारी, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी, प्रमुख राजकीय व्यक्ती, विविध माध्यमांचे प्रतिनिधी तसेच परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रमजानच्या पवित्र वातावरणात सर्व समाजघटक एकत्र आल्याने कार्यक्रमात सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी टोरेंट पॉवर कंपनीच्या वतीने उपाध्यक्ष जीवन क्लार्क, महाव्यवस्थापक जय पंड्या, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी चेतन बदियानी, चीफ ऑफ सेक्युरिटी ब्रिगेडियर विनय बहल तसेच पीआरओ शशिकांत कोठेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे जिव्हाळ्याने स्वागत केले. पाहुण्यांसाठी इफ्तारची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमादरम्यान हाफिज रोशिक रझा यांनी उपस्थित पाहुण्यांना रमजान महिन्याचे धार्मिक व सामाजिक महत्त्व समजावून सांगितले. उपवास, संयम, दानधर्म आणि बंधुभाव या मूल्यांमुळे समाजात सौहार्द आणि एकोप्याची भावना वृद्धिंगत होते, असे त्यांनी सांगितले.
उपस्थित पाहुण्यांनी टोरेंट पॉवरने केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थेचे कौतुक केले. अशा प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांमुळे शहरातील नागरिकांमध्ये परस्पर सहकार्य, शांतता आणि सुसंवाद वाढण्यास मदत होते, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
दरम्यान, टोरेंट पॉवरचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी चेतन बदियानी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कंपनीच्या लोगोमध्ये करण्यात आलेल्या बदलाबाबत माहिती दिली. तसेच अशा सामाजिक उपक्रमांमुळे कंपनी आणि स्थानिक समुदाय यांच्यातील संबंध अधिक दृढ होतात, असेही त्यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा