स्टंट कराल तर तुरुंगात जाल, दुचाकी स्टंटबाजांविरोधात मुंब्रा पोलिस व वाहतूक पोलिस आक्रमक


नफिसा गिरकर  : मुंब्रा–कौसा परिसरात  रस्त्यांवर बाईकवर धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या आणि बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात मुंब्रा पोलिस व वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करण्याचा पवित्रा घेतला आहे.  मित्तल ग्राउंड व एमएम व्हॅली रोड परिसरात काही युवकांकडून वेगाने बाईक चालवणे तसेच स्टंट करण्याचे प्रकार वाढल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पोलिसांनी असे प्रकार रोखण्यासाठी कारवाई सुरु केली आहे.  

गेल्या काही दिवसांत या स्टंटबाजीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. या व्हिडिओंमध्ये काही युवक सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करताना दिसत असल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर मुंब्रा पोलिसांनी वाहतूक पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई सुरू केली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान सात बाईक जप्त करण्यात आल्या असून पुढील काळातही अशा रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांवर लक्ष ठेवून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

याबाबत माहिती देताना मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितले की,  रस्त्यांवर स्टंटबाजी करणे किंवा रॅश ड्रायव्हिंग करून नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणे अजिबात सहन केले जाणार नाही. अशा प्रकारांवर सातत्याने कारवाई केली जाईल.

सायलेंट झोन करण्याचा व गतिरोधक बसवण्याचा वाहतूक पोलिसांचा प्रस्ताव

एमएम व्हॅली परिसराला ‘सायलेंट झोन’ घोषित करण्याचाही व या परिसरात गतिरोधक बसवण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे वाहतूक विभागाचे निरीक्षक अतुल आहेर यांनी  ठेवला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास एमएम व्हॅली, ग्रेस स्क्वेअर, सुकून हाइट्स आदी निवासी संकुलांतील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

रमजान महिन्यात विशेषतः रोजा इफ्तारपासून तरावीह नमाज संपेपर्यंत या भागात नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने त्या काळात वाहतूक पोलिसांची अतिरिक्त नियुक्ती करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच या परिसरात पोलिसांची गस्त वाढवून रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार असून नियम मोडणाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब