हाजी अली दर्गाह येथे ‘देसी सेहरी’ उत्साहात संपन्न
लोकमानस प्रतिनिधी
मुंबई : हाजी अली दर्गाह येथे शनिवारी रात्री पवित्र रमजान महिन्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक ‘देसी सेहरी’ कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. उद्योग, सामाजिक, सांस्कृतिक तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी या कार्यक्रमात सहभागी होत रमजानच्या पवित्र परंपरेचा आणि एकतेच्या संदेशाचा अनुभव घेतला.
हा कार्यक्रम माहीम आणि हाजी अली दरगाहचे व्यवस्थापकीय विश्वस्त सोहेल खंडवानी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करत रमजान महिन्याच्या माध्यमातून समाजात एकता, कृतज्ञता आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याच्या परंपरांचे महत्त्व अधोरेखित केले.
अरबी समुद्राच्या मध्यभागी एका छोट्या बेटावरील हाजी अली दर्गाह ही मुंबईतील अत्यंत ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान मानली जाते. या पवित्र स्थळाला दरवर्षी अंदाजे दोन कोटींहून अधिक भाविक आणि पर्यटक भेट देतात. त्यामुळे हाजी अली आणि माहीम दर्गाह ही मुंबईसह देशातील सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या आध्यात्मिक स्थळांपैकी एक मानली जातात.
दर्गाहच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींनी सहभाग घेत पारंपरिक देसी सेहरीचा आस्वाद घेतला. हा देसी सहरी कार्यक्रम मुंबईतील रमजानमधील एक महत्त्वाचा सांस्कृतिक उपक्रम ठरला असून, शहराच्या विविधतेचा आणि एकतेचा संदेश देणारा कार्यक्रम म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन सोहेल खंडवानी यांच्यासोबत आसिफ दादरकर, अरशद सय्यद, रियाज सय्यद, तनवीर मर्चेंट, एम. फारुख घीवाला आणि तुराब दरवेश यांनी केले.
या प्रसंगी आयोजकांनी हाजी अली परिसराच्या सुशोभीकरण आणि विकास आराखड्याबाबत माहिती देताना सरकारकडे प्रस्तावित असलेल्या जगातील सर्वात उंच राष्ट्रीय ध्वजांपैकी एक उभारण्याच्या योजनेचाही उल्लेख केला. या उपक्रमामुळे परिसराचे सौंदर्य वाढण्यासोबतच पर्यटनालाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशिकर, खासदार अनिल देसाई, काँग्रेसचे विधिमंडळातील उपनेते आमदार अमिन पटेल, अभिनेता जावेद जाफरी, माजी मंत्री नवाब मलिक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार मनोज जामसूतकर, इस्लाम जिमखानाचे अध्यक्ष माजी आमदार ॲडव्होकेट युसुफ अब्राहनी, माजी मंत्री काँग्रेसचे आमदार अस्लम शेख, कोकण मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकॆचे अध्यक्ष आसिफ दादन, अंजुमन-ए-इस्लाम चे अध्यक्ष पद्मश्री डॉ. जहीर काझी, ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते नजीब मुल्ला, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन चे राष्ट्रीय प्रवक्ते आणि माजी आमदार वारीस पठाण, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी, इब्राहिम शेख (भाईजान) यांच्यासहित विविध धर्मांच्या धर्मगुरूंचा समावेश होता.
उपस्थित पाहुण्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत असे कार्यक्रम सांस्कृतिक परंपरा जपण्यासोबत समाजातील सामाजिक एकात्मता अधिक बळकट करण्यास मदत करतात, असे मत व्यक्त केले. रमजानच्या पवित्र महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या या देसी सहरी कार्यक्रमामुळे धर्मनिरपेक्षतेचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा