मुंब्रा येथे गोळीबार, एका तासात आरोपीला अटक, अटक करताना आरोपीचा पोलिसांवर गोळीबार
नफिसा गिरकर : कौसा परिसरातील अरमान को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथील नदीम खान यांच्या वाहनावर शनिवारी पहाटे गोळीबार करण्यात आला. गोळीबाराची घटना घडल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र मुंब्रा पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत अवघ्या एका तासात आरोपीला शस्त्रासह ताब्यात घेतले. त्यावेळी आरोपीने पोलिस पथकावर गोळीबार केला. त्यामध्ये दोन व्यक्ती जखमी झाल्या.
जखमींमध्ये रहीम रियाज सय्यद व फारुख अब्दुल अहमद शेख यांचा समावेश आहे. फारुकला पोटावर किरकोळ जखम आणि रहीम ला डाव्या हाताच्या बोटावर जखम झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली. त्यांना उपचारासाठी काळसेकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने पोलिसांना पाहताच पाच गोळ्या झाडल्या.नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून पोलिस अधिकाऱ्यांनी गोळीबार केला नाही. मात्र पोलिसांनी धाडसी कारवाई करत आरोपीला फायरिंगमध्ये वापरलेल्या शस्त्रासह ताब्यात घेतले असून त्याच्याकडे या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.
७ मार्च रोजी पहाटे सुमारे ४.५४ वाजता बीट क्रमांक ३ ला एमडीटीवर कॉल प्राप्त झाला. कौसा, मुंब्रा येथील अरमान को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी परिसरात फायरिंग झाल्याची माहिती मिळताच पोलिसांचे तपास पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सपोनि तेजस सावंत आणि सपोनि अनिल सोनवणे हे पथकासह घटनास्थळी पोहोचले असता ही घटना कन्स्ट्रक्शन व्यवसायिक तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नदीम मोहीदिन खान उर्फ बाबा खान यांच्या घराबाहेर घडल्याचे समोर आले. त्यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या एमएच ०३ सीएन ५९०० क्रमांकाच्या चारचाकी वाहनावर एक गोळी झाडण्यात आली होती, तर आणखी एक गोळी हवेत फायर करण्यात आली होती.
घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार आरोपीचा पाठलाग केला. त्यानंतर डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आचार गल्ली येथे पोलिसांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, नदीम खान यांच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सध्या परिसरातील परिस्थिती पूर्णपणे शांत आणि नियंत्रणात आहे.
या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजस सावंत व सपोनि अनिल सोनवणे, पोहवा अंकुश शिंदे, पो.हवालदार अजीज तडवी, पोलिस शिपाई नितीन पाटोळे, कृष्णा आव्हाड, अजिंक्य महाडिक, प्रशांत घुले, सोपान काकड यांनी सहभाग घेतला.
अवघ्या एका तासात आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा