दिवा रेल्वे स्थानक परिसरातील बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई करा - दिवा शहर नागरी हक्क समितीची मागणी
नफिसा गिरकर - दिवा : दिवा रेल्वे स्थानक परिसरातील वाढत्या बेकायदा फेरीवाल्यांविरोधात तात्काळ कारवाई करण्याची जोरदार मागणी दिवा शहर नागरी हक्क समितीच्या वतीने ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समितीकडे करण्यात आली आहे.
दिवा रेल्वे स्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर फेरीवाले रस्ते अडवून बसत असल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास गंभीर अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे सतत वाहतूक कोंडी होत असून आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका तसेच सार्वजनिक वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
स्थानिक प्रशासनाकडे संबंधित परिसर फेरीवाला मुक्त विभाग घोषित करण्याचा अधिकार असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे समितीचे म्हणणे आहे. परिणामी नियमांचे उघड उल्लंघन सुरू असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.
समितीच्या प्रमुख मागण्या:
दिवा रेल्वे स्थानक परिसर तात्काळ फेरीवाला मुक्त विभाग घोषित करावा,
सर्व बेकायदा फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करावी,
भविष्यात अशा अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी विशेष पथक नियुक्त करावे,
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात
प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिवा शहर नागरी हक्क समितीने दिला आहे.
यावेळी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिव प्रसाद नागरगोजे यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी समितीचे हिरा पाटील, ॲड. रोहिदास मुंडे, सचिन पाटील, विजय भोईर, तुषार पाटील, रोशन भगत, दिलीप भोईर, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा