मुंब्रा येथील लष्कर भरतीला चांगला प्रतिसाद, दहा हजार पेक्षा जास्त उमेदवारांचा सहभाग
नफिसा गिरकर : मुंब्रा येथील मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आलेल्या लष्करातील अग्नीवीर भरतीचा समारोप झाला. या भरती प्रक्रियेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून यामध्ये राज्यातील १५ जिल्ह्यांमधील १० हजारहून अधिक उमेदवारांनी सहभाग घेतला.
ही भारतीय सेनेची भरती रॅली दोन आठवड्यांच्या काटेकोर छाननी व मूल्यमापन प्रक्रियेनंतर यशस्वीरित्या पार पडली. यामुळे देशसेवेसाठी युवकांमध्ये असलेला उत्साह व निष्ठा अधोरेखित झाली.या कार्यक्रमात ९० टक्क्यांहून अधिक उपस्थिती नोंदविण्यात आली, त्यामुळे भारतीय सेनेबद्दल युवकांमध्ये असलेला विश्वास, अभिमान आणि आदर स्पष्ट झाला, असे लष्करातर्फे सांगण्यात आले.
मुंबई शहर,मुंबई उपनगर ठाणे,रायगड, नाशिक,पालघर, धुळे, नंदुरबार तसे पुणे आर ओ मुख्यालयाच्या अंतर्गत येणारे सात जिल्हे इथून या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार उपस्थित राहिले होते.
भरती प्रक्रिया निर्धारित नियम व धोरणांनुसार पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडली. संपूर्ण रॅलीदरम्यान निष्पक्षता, नैतिकता आणि गुणवत्ताधारित निवड प्रक्रियेचे उच्चतम निकष कायम ठेवण्यात आले. शारीरिक चाचण्या, वैद्यकीय तपासणी, कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.
लष्कराने सर्व नागरी प्राधिकरणे व संबंधित घटकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहे. अशा समन्वयातून सशस्त्र सेना आणि नागरी प्रशासन यांच्यातील नाते अधिक दृढ होत असून राष्ट्रनिर्मितीस मोठा हातभार लागतो असे लष्करातर्फे सांगण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा