मुंब्रा-कौसा मधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस व लोकप्रतिनिधींचा पुढाकार


नफिसा गिरकर : रमजान महिन्यात वाढणारी गर्दी आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन मुंब्रा-कौसा परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत.


रमजानच्या काळात संध्याकाळनंतर बाजारपेठांमध्ये व मशिदींलगत मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होते. त्यातच रस्त्याच्या कडेला उभे राहणारे अनधिकृत फेरीवाले व बेकायदा पार्किंग यामुळे वाहतुक कोंडीची समस्या तीव्र होते. या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलिस आयुक्त प्रिया ढमाले आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेतला असून, संबंधितांना आवश्यक त्या सूचना देत शिस्तबद्ध नियोजनाची अंमलबजावणी सुरू केली आहे.तसेच नगरसेविका मर्झिया पठाण यांच्या फाउंडेशनतर्फे स्वयंसेवकांची टीम रस्त्यावर उतरून वाहतूक नियमन करत आहे.


नगरसेविका  पठाण यांच्या पुढाकारातून अमृतनगर व दारुल फलाह मशीद परिसर येथे स्वतः  पठाण व स्वयंसेवक मध्यरात्रीपर्यंत कार्यरत राहून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मदत करत आहेत. गेल्या सहा वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवण्यात येत असून, सुमारे शंभर स्वयंसेवक रोज उशिरापर्यंत सेवा देत आहेत. त्यामध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. 


खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची वाहने रस्त्यावर पार्क केली जात असल्याने कोंडीत भर पडते. त्यासाठी अमृतनगरजवळील मैदानात वाहनांसाठी विनामूल्य पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे,अशी माहिती पठाण यांनी दिली.त्यामुळे रस्त्याच्या कडेला होणारे अनधिकृत पार्किंग कमी होईल आणि वाहतुकीची कोंडी आटोक्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



रमजान काळात नागरिकांनी सहकार्य करावे, वाहने नियोजित ठिकाणीच पार्क करावीत आणि पोलिस व स्वयंसेवकांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेचे राष्ट्रवादी कॅांग्रेस शरद पवार पक्षाचे गटनेते शानू पठाण यांनी देखील याठिकाणी उपस्थित राहून आढावा घेतला.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दारुल फलाह येथील गार्डन १० वर्षांनंतर पुन्हा खुले

आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून मुंब्रा कौसा येथील तेरा शाळांना प्रोजेक्टर व संगणकांचे वितरण

प्रेषित मोहम्मद यांचा सोशल मीडियावर अवमान; गुन्हा दाखल