चित्रपटांतील वाढत्या हिंसाचाराबाबत राज्य शासनाकडे तक्रार


नफिसा गिरकर :  चित्रपटांमध्ये वाढत्या प्रमाणात दाखविण्यात येणाऱ्या हिंसाचार आणि गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत मुंब्र्यातील सामाजिक कार्यकर्ता नुरूद्दीन नाईक यांनी पत्राद्वारे राज्य शासनाकडे गंभीर चिंता व्यक्त केली आहे.  नाईक यांनी मुख्यमंत्री तसेच सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांना पत्र पाठवून चित्रपटांतील आशयाचा समाजावर, विशेषतः तरुण पिढीवर होणाऱ्या परिणामाबाबत लक्ष वेधले आहे.

अनेक चित्रपटांमध्ये हिंसा, गुन्हेगारी आणि समाजविघातक वर्तनाचे गौरवीकरण केले जात आहे. समस्यांचे निराकरण करण्यासाठी हिंसक मार्ग योग्य असल्याचे चित्रण केल्यामुळे तरुणांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारच्या आशयामुळे आक्रमक वृत्ती वाढण्याची तसेच कायद्याबाबत अनास्था निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

शासनाने चित्रपटांच्या आशयाबाबत अधिक जबाबदारीची भूमिका घ्यावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे. चित्रपट प्रमाणन प्रक्रियेदरम्यान समाजावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा सखोल विचार करावा आणि आवश्यक तेथे कठोर भूमिका घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले आहे. यासाठी त्यांनी काही ठोस उपाययोजनांचा प्रस्ताव मांडला आहे. चित्रपटांमध्ये हिंसा आणि गुन्हेगारीचे चित्रण करण्यासाठी अधिक कडक मार्गदर्शक तत्त्वे लागू करावीत, समाजविघातक वर्तनाचे समर्थन करणाऱ्या चित्रपटांवर दंडात्मक कारवाई करावी तसेच सकारात्मक आदर्श आणि सामाजिक संदेशांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

चित्रपटांचा समाजावर होणारा प्रभाव हा चर्चेचा विषय ठरत असून, या संदर्भातील नाईक यांच्या पत्रामुळे पुन्हा एकदा सेन्सॉर धोरण आणि सामाजिक जबाबदारीबाबत चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दारुल फलाह येथील गार्डन १० वर्षांनंतर पुन्हा खुले

आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून मुंब्रा कौसा येथील तेरा शाळांना प्रोजेक्टर व संगणकांचे वितरण

प्रेषित मोहम्मद यांचा सोशल मीडियावर अवमान; गुन्हा दाखल