सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई - पोलिस सह आयुक्त डॅा ज्ञानेश्वर चव्हाण यांचा इशारा


नफिसा गिरकर :  सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणा-यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ठाण्याचे सह पोलिस आयुक्त डॅा ज्ञानेश्वर चव्हाण यांनी मुंब्रा मध्ये दिला. गुरुवारपासून रमजान महिन्याला प्रारंभ होत असून त्याच दिवशी शिवजयंती देखील आहे, या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी बुधवारी दुपारी मुंब्रा पोलिस स्थानकाला भेट देऊन अधिका-यांशी  संवाद साधला व परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक सूचना दिल्या.


यावेळी पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, काही समाजकंटक सोशल मीडिया व इतर माध्यमातून जाणिवपूर्वक भावना भडकावण्याचा प्रयत्न करत असतात. पोलिसांचे यावर बारीक लक्ष असून असे प्रकार करणा-यांविरोधात कडक कारवाई केली जाईल. यापूर्वी असे प्रकार केलेल्यांवर पोलिस लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी देखील असे प्रकार समोर आल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी. अशा प्रकारांमुळे शांतता धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. सामाजिक सौहार्द कायम ठेवण्यात नागरिकांनी सहकार्य करावे असे चव्हाण म्हणाले. 


रमजानच्या  महिन्यात  शरीर, मन, विचार व कृती चांगली ठेवली जाते . वाईट बाबींना बाजूला सारले जाते.रमजानच्या शुभेच्छा देताना चव्हाण यांनी नागरिकांनी एकोपा व बंधुभाव नेहमीप्रमाणे कायम ठेवावा असे आवाहन केले. यावेळी मुंब्रा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दारुल फलाह येथील गार्डन १० वर्षांनंतर पुन्हा खुले

मोंड-चिंचवाडी शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन, सत्यनारायणाची महापूजा संपन्न

मानसी घाडीची अकाली एक्झिट मनाला चटका लावणारी