मुंब्रा कौसामध्ये रमजान महिन्याला उत्साहात प्रारंभ


नफिसा गिरकर : मुंब्रा येथे पवित्र रमजान महिन्याची सुरुवात मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात झाली आहे. चंद्रदर्शनानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत संयम आणि सेवाभावाच्या या महिन्याचे स्वागत केले. शहरातील विविध भागांतील मशिदींमध्ये पहाटेच्या सहरीपासूनच हालचाल सुरू झाली असून रात्री विशेष तरावीह नमाजासाठी मोठी गर्दी होत आहे.मुंब्रा स्टेशन जवळील शैलेश नगर येथील मुख्य रस्त्यावर दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे त्यामुळे हा परिसर उजळून निघाला आहे. विविध मशिदी व परिसरात रोषणाई करण्यात आली आहे.


धार्मिकदृष्ट्या रमजान हा संयम, आत्मशुद्धी आणि दानधर्माचा महिना मानला जातो. रोजा (उपवास) ठेवून पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत अन्न-पाणी त्यागले जाते. संध्याकाळी इफ्तारच्या वेळी कुटुंबीय आणि मित्रपरिवार एकत्र येऊन रोजा सोडतात. 

रमजान व आर्थिक उलाढाल

पवित्र रमजान महिन्याच्या आगमनाने शहरातील बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आर्थिक उलाढालीलाही मोठी चालना मिळाली आहे. रोजा व इफ्तार  साठी विविध वस्तूंची मागणी वाढली असून व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. रमजान सुरू होताच खानपानाच्या वस्तूंची खरेदी वाढली आहे. इफ्तारसाठी लागणाऱ्या खजूर, फळे, शरबत,फराळाच्या पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. परिणामी फळे व इतर खाद्यपदार्थांचे दर वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. मालपुवा, पुलाव व खिचडा यांसारखे पदार्थ विशेष करून रमजान मध्येच पाहायला मिळतात. काही व्यापारी तर फक्त रमजान साठी गावावरून मुंब्रा येथे येतात, महिनाभर व्यवसाय करतात व ईद नंतर परत आपल्या गावी परततात. दिवसभर तुलनेने थंड असलेली बाजारपेठेत इफ्तार नंतर जणू चैतन्य येते.


 कपड्यांच्या बाजारातही मोठी गर्दी होत आहे. ईदसाठी नवीन कपडे खरेदी करण्याची परंपरा असल्याने रेडिमेड कपडे, पारंपरिक पोशाख, ड्रेस मटेरियल आणि मुलांचे कपडे मोठ्या प्रमाणावर बाजारात उपलब्ध झाले आहेत. वाढत्या मागणीमुळे कपड्यांच्या दरातही वाढ झाली आहे. घर सजावटीच्या वस्तू, लाईटिंग तसेच सुगंधित साहित्य व अत्तर यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.

सुरक्षा व्यवस्था व वाहतुक नियोजनप्र

शासन आणि पोलिसांकडून मशिदी व गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. इफ्तार नंतर खवैय्यांची व खरेदी करणा-यांची गर्दी वाढते तसेच रोजच्या तुलनेत फेरीवाले जास्त वाढल्याने वाहतूक कोंडी वाढते.हे टाळण्यासाठी काही भागांत विशेष करून अमृतनगर येथे काही स्वयंसेवकही वाहतुकीचे नियोजन करण्यात पोलिसांना मदत करतात.

विविध धर्मीय नागरिकांकडूनही रमजानच्या शुभेच्छा दिल्या जात असून  सामुदायिक सलोखा आणि एकात्मतेचे दर्शन घडत आहे. आगामी ईद-उल-फित्रपर्यंत हा पवित्र महिना भक्तीभावात साजरा केला जाणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब