दारुल फलाह येथील गार्डन १० वर्षांनंतर पुन्हा खुले
नफिसा गिरकर : मुंब्रा - दारुल फलाह परिसरातील गार्डनचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे तौहिद शेख व नगरसेवक इब्राहिम राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे दहा वर्षे हे गार्डन बंद अवस्थेत होते. दरम्यानच्या काळात या ठिकाणी नशेखोरांचा अड्डा निर्माण झाल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आता हे गार्डन पूर्ववत करण्यात आले असून येथे नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. या गार्डनमुळे आता परिसरातील नागरिक व लहान मुले याचा लाभ घेऊ शकतील.
याठिकाणी कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी पोलिसांना पत्र देण्यात आले असून वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची भेट घेऊन योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. “गार्डनमध्ये कोणतेही चुकीचे कृत्य होऊ देणार नाही, तसेच गार्डन अधिक सुशोभित करून पुन्हा विकसित करण्यात येईल,” असे आश्वासन तौहिद शेख यांनी दिले.
नगरसेवक इब्राहिम राऊत यांनी सांगितले की, “मागील अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित होती. या प्रभागात आमच्या उमेदवारांच्या पराभवानंतरही विकासकामे थांबवली नाहीत. परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष आरिफ खानही उपस्थित होते.
स्थानिक नागरिक प्रतिक्रिया देताना म्हणाले, अनेक वर्षांपासून हे काम रखडले होते. अखेर गार्डन नागरिकांसाठी खुले झाले, याचा आनंद आहे. पराभवानंतरही आश्वासन पूर्ण केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा