प्रभाग क्रमांक 30 मधील नागरिक पाणीटंचाईने त्रस्त,राजकीय दबावामुळे त्रास होत असल्याचा नगरसेवकांचा आरोप
नफिसा गिरकर : मुंब्रा कौसा मधील प्रभाग क्रमांक 30 मधील नागरिक गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईने त्रस्त आहेत. रमजान महिना सुरू असताना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. या प्रभागातून एम आय एम चे चारही नगरसेवक विजयी झाले आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष व प्रशासनाकडून जाणीवपूर्वक पाणीटंचाई केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.
या परिसरात अमिनाबाद,एमटीएनएल कंपाऊंड,शरीफा रोडचा मागील काही भाग अशा ठिकाणी अत्यंत कमी दाबाने पाणी येणे, दोन-तीन दिवसातून एकदा पाणी येणे अशा तक्रारी स्थानिक नागरिकांकडून केल्या जात आहेत . राजकीय कुरघोडीतून ही समस्या उद्भवल्याचा आरोप नागरिक करत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना टँकरने पाणी वापरण्याची वेळ फेब्रुवारी महिन्यातच आली आहे.
येथील स्थानिक नगरसेवक नफीस अन्सारी यांनी पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ कर्मचारी व प्रशासन दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करून असे काम करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. एका दिवसात तब्बल 12 टँकरने पाणीपुरवठा केला आला असून नागरिकांचे हाल होऊ नयेत याची काळजी घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
वॉल्व्ह मॅन विरोधकांच्या इशारावर काम करत असल्याचे काही ठिकाणी उघडकीस आले असून त्यांच्या विरोधात बदलीची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. ही समस्या केवळ गेल्या महिन्याभरात उद्भवलेली नसून यापूर्वीही या परिसरात पाणीटंचाई भेडसावत असल्याकडे अन्सारी यांनी लक्ष वेधले . परंतु विरोधक याबाबत राजकीय षड्यंत्र रचून जाणीवपूर्वक आम्हाला त्रास देत असल्याचे ते म्हणाले.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून ही समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली . या प्रभागातील पाणीपुरवठ्याच्या गंभीर स्थितीवर ठाण्याचे महापालिका आयुक्त सौरभराव यांच्यासोबत एमआयएमच्या सर्व नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट घेऊन त्यांचे याकडे लक्ष वेधले असून आयुक्तांनी देखील ही समस्या लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याचे नफिस अन्सारी म्हणाले.
प्रभागातील काही ठिकाणी जुन्या लाईन मुळे पाणीपुरवठ्यात अडथळा होत असल्याने नवीन लाईन टाकण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
कोट
प्रभाग क्रमांक 30 मधील काही भागात पाणीटंचाईची समस्या पूर्वीपासून आहे .कमी दाबाने पाणी येण्याची तक्रार अनेकदा होते .त्या परिसरातील तपासणी व इतर कामे युद्धपातळीवर करण्यात येत असून येत्या दोन-तीन दिवसात ही कामे पूर्ण होतील व पाणीटंचाईची समस्या मार्गी लागेल.राजकीय दबावामुळे पाणीटंचाई होत असल्याचा आरोप निराधार आहे.
- संजय वाघुले ,कनिष्ठ अभियंता ,पाणीपुरवठा विभाग ठाणे महापालिका
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा