ड्रग्ज माफियासोबतचा नजीब मुल्ला यांचा फोटो राष्ट्रवादी काँग्रेसकडून सादर, मनिषा कायंदे आणि चुकीचे वृत्त दाखवणाऱ्या वाहिनीवर 100 कोटीचा दावा

 ड्रग्ज माफियासोबतचा नजीब मुल्ला यांचा फोटो
राष्ट्रवादी काँग्रेसकडून सादर,  
मनिषा कायंदे आणि चुकीचे वृत्त दाखवणाऱ्या वाहिनीवर 100 कोटीचा दावा
 लोकमानस प्रतिनिधी -
ठाणे - 
  रस्त्यात काढलेल्या फोटोवर आमचे आणि अंमली पदार्थ विक्रेत्यांचे संबध आहेत, असा आरोप शिंदे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी केला आहे. तर, काहीकाळ राष्ट्रवादीमध्ये वास्तव्यास आलेले आनंद परांजपे यांनी शानू पठाण यांचे आर्थिक व्यवहार तपासावे, अशी मागणी केली आहे. आनंद परांजपे हे ‘महाज्ञानी’ आहेत. पण, ते ज्या ठिकाणी बसलेत तिथले नेते नजीब मुल्लाही ड्रग्ज माफिया सलमान फाळके याच्यासोबत फोटो काढत आहेत. त्यांचेही आर्थिक व्यवहार तपासण्याची गरज आहे.  
 आमचे जर ड्रग्ज माफियांशी संबंध असतील तर आम्ही फासावर चढण्यास तयार आहोत, असे सांगत मनिषा कायंदे यांच्या माहितीशी शहानिशा न करता चुकीचे वृत्त प्रसारित करणाऱ्या वृत्तवाहिनीला व कायंदे यांना 100 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस बजावली असून मुंब्रा पोलीस ठाण्यात भादंवि 500 अन्वये तक्रारही दाखल केली आहे, अशी माहिती ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.  
 पत्रकार परिषदेत देसाई यांनी नजीब मुल्ला आणि ड्रग्ज माफिया सलमान फाळके यांचे एकत्र छायाचित्र पत्रकारांना दाखवून ,‘हा फाळके नजीब मुल्ला यांचा नातेवाईक आहे का’? असा सवालही उपस्थित केला.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड आणि ठामपाचे माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्यावर शिंदे गटाच्या मनिषा कायंदे यांनी केलेल्या आरोपांचा ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी समाचार घेतला. तसेच, ड्रग्सप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेवर भाष्य करताना आनंद परांजपे यांनी बोट ठेवले होते. त्यावरही देसाई आणि शानू पठाण यांनी खरमरीत टीका केली. 

सुहास देसाई म्हणाले की, आमचे नेते डॉ. आव्हाड यांच्यावर आनंद परांजपे हे टीका करीत आहेत. परांजपे हे काही दिवसांसाठी राष्ट्रवादीमध्ये वास्तव्यास आले होते. त्यांना डॉ. आव्हाड यांनी मानसन्मान दिला. ते आज विश्वासघात करुन गेले आहेत. त्यामुळे त्यांनी उगाच कुरघोड्या करु नयेत. कारण, आमच्याकडेही अनेक पुरावे आहेत. जर, आम्ही हे पुरावे बाहेर काढले तर त्यांना पळता भुई थोडी होईल. काल मनिषा कायंदे यांनी दाखविलेल्या फोटोंच्या आधारे परांजपे टीका करीत असतील तर सलमान फाळके हा नजीब मुल्ला यांचा नातेवाईक आहे का?  फोटो दाखवून आरोप करणाऱ्यांना एकच सांगणे आहे की, उगाच आम्हाला पुरावे सादर करण्यास भाग पाडू नका. गेल्या काही दिवसांपूर्वी एनआयएचे छापे राबोडीत पडले होते. ज्या ठिकाणी छापे पडले ती इमारत कोणी बांधली आहे? ज्याच्या घरावर छापे पडले त्याचे कुणाशी सबंध आहेत? ज्याच्यासाठी एनआयएचे पथक राबोडीमध्ये आले; त्याचा भाऊ कोणाच्या कार्यालयात कोणाचे व्यवहार सांभाळत असतो, हे सर्व जगाला माहित आहे. कोणाचे गुन्हेगारांशी संबध आहेत, याची माहिती आम्हाला आहे. मनिषा कायंदे यांनी आरोप करताना जरा माहिती घ्यायला हवी होती. त्या ज्या पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात त्या पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्रीदेखील गुंडांसोबत फोटो काढत असतात, त्याचा आम्ही काय अर्थ घ्यायचा? शानू पठाण यांनीच मुंब्रा भागात अंमली पदार्थांविरोधात रॅली काढली होती. अनेक ड्रग्ज पेडलर्सला पकडून काळे फासले होते. 

 शानू पठाण म्हणाले, नाशिकमध्ये अंमली पदार्थांची फॅक्टरी सापडल्यानंतर काही लोकांचे फोटो शोधून त्यांना अडकवण्याचा कट रचण्यात येत आहे. राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी मोजकेच निवडलेले फोटो काढून लक्ष्य करण्यात येत आहे. आम्ही सर्व शरद पवार आणि डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत असल्यानेच आम्हाला लक्ष्य करण्यात येत असेल तर आम्ही त्यास घाबरणारे नाहीत. मनिषा कायंदे आणि आनंद परांजपे यांना आपले सांगणे आहे की, सलमान फाळके याला अनेकांसोबत फोटो काढण्याची सवय असावी. म्हणूनच त्याचे राजकीय नेते, आमदार, पोलीस अधिकारी यांच्यासोबत फोटो आहेत. मात्र, भाजपच्या वॉशिंगमध्ये जे जाण्यास तयार नाहीत. त्यांना टार्गेट करुन खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. 23 फेब्रुवारी रोजीच आपण गृहमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून आपणाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात येईल, असे कळविले होते. आपले परांजपे यांना खुले आव्हान आहे की त्यांनी जसे माझ्या व्यवहारांची तपासणी करण्याची मागणी केली आहे. तशीच मागणी करण्याची धमक त्यांनी फालकेसोबत ज्यांचे फोटो आहेत 
आहेत त्यांचेही व्यवहार तपासाबाबत दाखवावी. फालके हा ज्यांच्या कानाजवळ जाऊन बोलत होता. त्यांचे काय धंदे आहेत? बिल्डरला धमकावून, ब्लॅकमेल करुन खंडणी कोण उकळत होता? पोलिसांच्या मदतीने आपले गैरधंदे कोण दाबून ठेवत होता? असे प्रश्न करीत जमील शेख हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर खून करायचे आणि नंतर भाजपच्या जवळ जायचे, ही नीती ज्यांनी आखली आहे; त्यांच्याबद्दलही आनंद परांजपे यांनी भाष्य करावे, असेही आवाहन शानू पठाण यांनी केले. 

भाजपमध्ये, शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात गुंडांचा भरणा आहे. भाजपमध्ये राहून गुन्हेगारी करणारे हे लोक भाजपच्या वॉशिंग मशीनचे लाभार्थी आहेत. आमच्यावरही असाच दबाव टाकला जात आहे. मात्र, त्यांच्या दबावाला आम्ही बळी पडत नसल्यानेच आमच्यावर असे खोटे आरोप केले जात आहेत, अशी टीकाही पठाण यांनी केली.  
दरम्यान, आरोप करणाऱ्या मनिषा कायंदे यांच्यावर 100 कोटींचा दावा करण्यात येणार असून तशी नोटीसही बजावण्यात आली आहे. शिवाय, या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबतही प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याचे पठाण यांनी सांगितले. 
या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे ठाणे शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्षा सुजाता घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही