लाखो श्रीसदस्यांच्या उपस्थितीत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान
लाखो श्री सदस्यांच्या उपस्थितीत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान
नवी मुंबई - वीरता, भक्ती व सामाजिक चेतना या तीन मार्गांनी देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, समाज बांधवांसाठी काम करण्याची शिकवण दिली आहे. या देशाला ‘सर्वे भन्वतुः सुखिनः’ या मंत्राची आवश्यकता असताना लाखो लोकांची फळी उभी करण्याचे काम आप्पासाहेबांनी केले आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गौरव केले. राज्य शासनाच्या वतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब ऊर्फ दत्तात्रेय धर्माधिकारी यांना सन २०२२ चा महाराष्ट्र भूषण हा सन्मान आज केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी श्री. शहा बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, धर्माधिकारी प्रतिष्ठानचे डॉ. सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री श्री. शहा म्हणाले की, कोणत्याही प्रसिद्धीची आस न ठेवता समाज सेवा करणारा हा एवढा मोठा जनसमुदाय मी आयुष्यात पहिल्यांदा पाहत आहे. या प्रकारचा मान, सन्मान, भक्तीभाव हा केवळ त्याग, समर्पण व सेवेद्वारेच मिळत असते. आप्पासाहेबांप्रती आपले प्रेम, विश्वास व सन्मान हा त्यांच्या संस्काराचा, कर्तृत्वाचा व नानासाहेबांच्या शिकवणीचा सन्मान आहे. एकाच परिवारात अनेक वीर जन्मलेले मी पाहिले आहेत. मात्र, समाजसेवेचे संस्कार तीन तीन पिढ्यांपर्यंत असलेले मी आयुष्यात प्रथमच पाहत आहे. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण सन्मान देऊन त्यांच्यासारखं लाखो लोकांना जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याबद्दल त्यांचे व राज्य शासनाचे मी अभिनंदन करतो, असेही श्री. शहा यांनी यावेळी सांगितले. महान छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुण्यभूमीने देशाला तीन मार्ग दाखविले. राष्ट्रासाठी जीवन अर्पण करण्याचा वीरतेचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केला. स्वातंत्र्यवीर सावरकर, चाफेकर बंधू, आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळकांनी स्वराज्य, सन्मानासाठी आपले जीवन अर्पिले. संतपरंपरेचा अध्यात्मिक मार्ग हा दुसरा मार्ग या भूमीने दिला आहे. समर्थ रामदास, संत तुकाराम महाराजापासून नामदेवांपर्यंत या सर्वांनी महाराष्ट्रातील भक्तीच्या, अध्यात्माच्या मार्गाचे देशाचे नेतृत्व करण्याचे काम केले आहे. सामाजिक चेतनेचा तिसरा मार्गही येथूनच सुरू झाला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक सामाजिक चेतनेच्या जनकांची महाराष्ट्र ही भूमी आहे. ही सामाजिक चेतना जागृत करण्याचे व ती पुढे नेण्याचे काम आज नानासाहेब, आप्पासाहेबांनी सुरू ठेवले आहे. समाजासाठी, दुसऱ्यांसाठी जगण्याची शिकवण देण्याचे काम या भूमीने केले आहे. कर्तृत्वाने दिलेली शिकवण चिरंजीव राहते. समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, बांधवांसाठी काम करण्याची शिकवण आप्पासाहेबांनी दिली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले असल्याचेही श्री. शहा यांनी यावेळी सांगितले. धर्माधिकारी कुटुंबियांनी आपल्या कर्तृत्वाने समाजामध्ये सुधारणा केली. मुलांसाठी शिक्षण, वृक्षारोपण, स्वच्छता, रक्तदान, जलसिंचन, विहिरींची सफाई, महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्त समाज अशा विविध क्षेत्रात आप्पासाहेबांनी मोलाचे कार्य केले आहे. मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म हा विचार रुजवायलाहवा - डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारीपुरस्काराला उत्तर देताना डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले की, माझ्या आयुष्यातील हा भाग्याचा क्षण आहे. पुरस्कार हा मोठाच असतो. कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिल्याने हा त्या कार्याचा गौरव आहे. या सगळ्यांचे श्रेय सर्व श्री सदस्यांना जाते. खेड्यागावातील लोकांना, त्यांच्या रितीरिवाजांना चांगले उत्तम वळण लागायला हवे, यासाठी कामाची सुरुवात केली. प्रसिद्धीपासून लांब राहत कार्य सुरू आहे. मानवता धर्म हा सर्वात श्रेष्ठ आहे, या विचारांची रुजवात अंतकरणात व्हायला हवे. शेवटच्या श्वासापर्यंत हे कार्य सुरू ठेवणार आहे. सचिनदादा हे कार्य पुढे चालविणार आहेत. कार्य हे श्रेष्ठ आहे. माणूस नसला तरी ते सुरूच राहणार आहे. हा पुरस्कार म्हणजे आपल्या कार्याचा सन्मान आहे. त्यामुळे हा पुरस्कार सर्वांना समर्पित करत असल्याचेही श्री. धर्माधिकारी म्हणाले. देशाचे, आईवडिलांचे, समाजाचे ऋण फेडण्यासाठी काय सेवा केली, हे प्रत्येकाने ठरविली पाहिजे. त्यासाठी प्रत्यक्ष काम केले पाहिजे. देशसेवेबरोबर समाज सेवा करण्याचे काम मंत्री करीत आहेत. समाजसेवा ही सर्वात श्रेष्ठ आहे. त्यासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान उभे केले. त्यासाठी प्रत्येकाने किमान पाच पाच झाडे लावायला हवेत. त्यामार्फत वृक्षारोपणाचे काम सुरू आहे. देशातील प्रत्येक मानवाचे आरोग्य सुदृढ असावे व आनंद आयुष्य जगावे यासाठी आरोग्य शिबिर घेत आहोत. रक्तदान व थॅलेसिमेया रुग्णांसाठी रक्त पुरवठा ही पण एक समाजसेवा आहे. आजपासून प्रत्येकाने ही सेवा सुरु करावी. राज्य शासनाचे जलसंधारणाचे मोठे काम सुरू आहे. त्याद्वारे पाणी जिरविण्याच्या कामातही योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
उद्ध्वस्त कुटुंबांना वाचविण्याचं, दिशा देण्याचे कामआप्पासाहेबांनी केलं - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गारयावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, धर्माधिकारी कुटुंबिय राज्यात गेल्या अनेक पिढ्यांपासून लोकांना दिशा देण्याचे काम करत असून ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यासाठी या परिवाराचे मोठे योगदान आहे. उध्वस्त कुटुंबांना सावरण्याचं काम नानासाहेब, आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलं असून आता सचिनदादा धर्माधिकारी हा वारसा पुढे नेत आहेत. माणसं घडविण्याचं विद्यापीठ म्हणजे रेवदंडा असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले. या सोहळ्याला मी एक श्री सदस्य म्हणून उपस्थित असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी उपस्थित जनसागराला अभिवादन केले.
राजकीय सत्तेपेक्षा अध्यात्मिक शक्ती मोठी असते त्याचे स्वरूप या ठिकाणी आपण पाहतोय. राजकीय शक्तीला अध्यात्मिक अधिष्ठानाची जोड, आशीर्वाद आणि प्रेरणा या ठिकाणी लागते. त्याचे जिवंत उदाहरण या ठिकाणी आपण पाहतो आहे. ही गर्दी सगळे रेकॉर्ड मोडणारी असून याचे रेकॉर्ड मोडायचा असेल तर ते फक्त आणि फक्त आप्पासाहेबांचे श्री सदस्यच मोडू शकतात, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, हुंडा यासारख्या अनिष्ट प्रथा दूर करण्याचे काम नानासाहेबांनी, आप्पासाहेबांनी केलं. मोह, माया, मत्सर याच्यापासून आपण दूर कसं जाऊ याची शिकवण आप्पासाहेबांनी दिली. सरकार म्हणून काम करीत असताना आम्ही देखील आप्पासाहेबांचे विचार आचरणात आणून सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. ठिपक्या ठिपक्यांनी रांगोळी तयार होते तसे माणसं जोडून माणुसकीचा महासागर आप्पासाहेबांनी निर्माण केला आहे. अरे माणसा माणसा कधी व्हशील माणूस तू.. या बहिणाबाईंना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आप्पासाहेबांच्या माणूस घडविण्याच्या याच कार्यातून मिळते. व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, आरोग्य शिबीर, जलसंधारण, ग्रामस्वच्छता, शिक्षण, मार्गदर्शन अशा सर्व मार्गांनी आप्पासाहेबांनी समाज घडविला आहे. त्यासाठी धर्माधिकारी प्रतिष्ठान हे मला एखाद्या दीपस्तंभासारखे वाटते, असे सांगत आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केल्यामुळे महाराष्ट्राचा गौरव झाल्याची भावना व्यक्त केली.
|
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा