कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून रोजगार वाढीसाठी प्रयत्न - मंगलप्रभात लोढा

कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून रोजगार वाढीसाठी प्रयत्न - मंगलप्रभात लोढा
लोकमानस प्रतिनिधी
मुंबई : राज्यात कौशल्य विकास विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य अभिजित वंजारी यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
मंत्री लोढा म्हणाले की, बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनाने कौशल्य विकास विभागामार्फत विविध योजना राबविण्याला प्राधान्य दिले आहे. यासाठी १२०० कोटी रूपये खर्च करून ४१८ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर कोणते अभ्यासक्रम महत्त्वाचे आहेत याबाबत स्थानिकांचे मत विचारात घेऊन एक, दोन, तीन महिन्यांचे विविध अभ्यासक्रम तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

कमी लोकसंख्येच्या गावात ५०० कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येत आहेत. नोंदणीकृत बेरोजगारांपेक्षा नोंदणी न केलेल्यांची संख्या अधिक असून कौशल्य विकास केंद्रांचा त्यांना लाभ होईल, असे मंत्री श्री.लोढा म्हणाले. रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून तसेच विविध आस्थापनांशी सामंजस्य करारांच्या माध्यमातून ४२ हजार जणांना रोजगार उपलब्ध झाले आहेत. यापुढे नवीन ॲप विकसित करून त्यावर रिक्त जागांची माहिती ठेवण्याची सूचना कंपन्यांना करण्यात येईल.

राज्यात २०० कोटी रुपयांचा नावीन्यता निधी तयार करण्यात आला असून यातील २० टक्के निधी आयटीआयसाठी, तर २० टक्के निधी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

यासंदर्भात झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, प्रवीण दटके, अनिकेत तटकरे, सतीश चव्हाण, प्रवीण दरेकर, सचिन अहिर, किरण सरनाईक आदींनी सहभाग घेतला. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही