एलपीजी संकट आणि परराष्ट्र धोरणावर अखिलेश यादव यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल


नफिसा गिरकर - मुंबई : 

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी एलपीजी गॅस संकट तसेच देशाच्या परराष्ट्र धोरणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली. आज देशात एलपीजी ही ‘लापता गॅस’ बनली आहे,अशी टीका त्यांनी केली.मुंबई दौऱ्यावर आलेले अखिलेश यादव शनिवारी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व आमदार अबू आसिम आझमी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला उपस्थित होते. 


या कार्यक्रमाला शिवसेना उबाठाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत, माजी आमदार युसुफ अब्राहनी, कपिल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



यावेळी बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, एलपीजी आणि ऊर्जा सुरक्षेचा प्रश्न थेट देशाच्या परराष्ट्र धोरणाशी संबंधित आहे. भारत खरोखरच “विश्वगुरू” बनत असेल तर त्याने युद्धाच्या विरोधात ठाम भूमिका घेऊन शांततेचा संदेश दिला पाहिजे. सरकारने या विषयावर आधीच स्पष्ट भूमिका घेतली असती तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, असेही त्यांनी नमूद केले.


युद्धामुळे केवळ लोकांचे जीव गेले नाहीत, तर त्याचा परिणाम सामान्य जनतेवरही होत आहे. एलपीजीच्या टंचाईमुळे घरगुती स्वयंपाकापासून ते हॉटेल व्यवसायापर्यंत अनेक क्षेत्रे प्रभावित झाली आहेत. अनेक हॉटेल्स बंद होण्याच्या स्थितीत असून लोकांना गॅसची तीव्र कमतरता भासत आहे. भाजप अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.



होरमुज परिसरातून पाठवण्यात येणाऱ्या इंधन कंटेनरबाबत सरकारने पारदर्शक माहिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्या भागातून नेमके किती कंटेनर पाठवले गेले याबाबत वेगवेगळी माहिती समोर येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारताचा बाजार विदेशी कंपन्यांच्या हाती दिला जात असून विकासाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळेच धार्मिक मुद्दे पुढे करून लोकांचे लक्ष विचलित केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.


पंतप्रधानांच्या मतदारसंघातही गॅससाठी रांगा लागत असतील, तर देशातील इतर भागांची परिस्थिती काय असेल याची कल्पना येते, असे ते म्हणाले. भाजप धार्मिक मुद्द्यांवरच राजकारण करत असल्याची टीका करत भाजपाचा संपूर्ण राजकीय अजेंडा धर्माधारित राजकारणावर आधारित असल्याचा आरोपही त्यांनी केला.


दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी अशा इफ्तार कार्यक्रमांमुळे समाजात सौहार्द आणि बंधुभाव वाढतो, असे सांगितले. येथे राजकारणाची चर्चा केली जात नाही, तर विविध समाजघटक एकत्र येऊन संवाद साधतात, असेही त्यांनी नमूद केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब