आ.निरंजन डावखरे यांनी विधानपरिषदेत मांडले ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न ; पदोन्नती कालावधी कमी करण्यासह अनुकंपा नियुक्त्यांबाबत शासनाची सकारात्मक भूमिका
नफिसा गिरकर - महाराष्ट्र विधानपरिषदेत मंगळवारी म.वि.प. नियम ९७ अंतर्गत झालेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी ठाणे महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न तसेच अनुकंपा तत्वावरील प्रलंबित नियुक्त्यांचा अत्यंत महत्त्वाचा व कर्मचारी हिताशी संबंधित मुद्दा प्रभावीपणे सभागृहात मांडला.
चर्चेदरम्यान आ. ॲड. निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केले की, शासनाच्या ६ जून २०१७ च्या अधिसूचनेनुसार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी आवश्यक सेवा कालावधी ३ वर्षे असताना ठाणे महानगरपालिकेत तो ५ वर्षे ठेवण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. नवी मुंबई व अकोला महानगरपालिकेच्या धर्तीवर ठाण्यातही हा कालावधी तातडीने ३ वर्षे करण्यात यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
तसेच शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर अनुकंपा तत्वावरील अनेक नियुक्त्या प्रलंबित राहिल्या असून संबंधित वारसांना न्याय मिळण्यात विलंब होत असल्याची गंभीर बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. काही प्रभावित कुटुंबांनी तीव्र भूमिका घेण्याचा इशारा दिल्याने या विषयावर मानवी दृष्टिकोनातून तातडीने निर्णय घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
याशिवाय, कर्मचाऱ्यांच्या सेवा अटींमध्ये एकसमानता राखणे, पदोन्नती प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि महानगरपालिकांमध्ये शासनाच्या धोरणांची एकसारखी अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचेही आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी नमूद केले. कर्मचारी वर्ग हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्याचा कणा असून त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे संवेदनशीलतेने पाहणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या चर्चेला उत्तर देताना मंत्री श्री. उदय सामंत यांनी विषयाचे गांभीर्य मान्य करत सकारात्मक भूमिका मांडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगत, ठाणे महानगरपालिकेचा जनरल बॉडीचा ठराव प्राप्त झाल्यानंतर शासनाच्या नियमानुसार पदोन्नतीचा कालावधी ५ वर्षांऐवजी ३ वर्षे करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांबाबत बोलताना मंत्री उदय सामंत यांनी हा अत्यंत संवेदनशील व भावनिक विषय असल्याचे नमूद करत, शिक्षण मंडळाच्या बरखास्तीनंतर आवश्यक आकृतीबंध व संचमान्यता प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना ठाणे महानगरपालिकेला दिल्या जातील, असे सांगितले. तसेच भविष्यातील भरती प्रक्रियेत संबंधित वारसांचा प्राधान्याने विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सेवा अटींमध्ये न्याय्य सुधारणा करणे तसेच अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांमध्ये संवेदनशील आणि मानवी दृष्टिकोनातून निर्णय घेणे आवश्यक असल्याची ठाम भूमिका आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी सभागृहात मांडली.
ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आ. डावखरे यांनी सभागृहात केलेली ही प्रभावी मांडणी आणि शासनाकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा