भारतीय नौदलाचे शिडाचे जहाज आयएनएसव्ही कौंडिण्यचे स्वागत
नफिसा गिरकर : पारंपरिक पद्धतीने बांधलेली भारतीय नौदलाची नौका ओमानमधील मस्कत येथून आपला पहिला ऐतिहासिक परदेश प्रवास करुन परतली आहे. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी मुंबईतील नौदलाच्या तळावर भारतीय नौदलाचे शिडाचे जहाज आयएनएसव्ही कौंडिण्यचे स्वागत केले.
याप्रसंगी बोलताना संरक्षण राज्यमंत्र्यांनी या मोहिमेचे राष्ट्रीय महत्त्व समजावून सांगितले. आयएनएसव्ही कौंडिण्यने भारताच्या प्राचीन सागरी ज्ञान प्रणालीच्या पुनरुत्थानाचे प्रतीक आहे आणि ते देशातील युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे ते म्हणाले. या प्रवासातून प्रतिबिंबित झालेले धाडस, चिकाटी आणि शोधक वृत्ती अधोरेखित करुन त्यांनी युवा भारतीयांना आपल्या सांस्कृतिक आत्मविश्वासावर आधारलेल्या साहस व नवोन्मेषासाठी प्रोत्साहन दिले.
संजय सेठ यांनी युवा पिढीला आपल्या सांस्कृतिक आत्मविश्वासावर आधारलेल्या साहस व नवोन्मेषाचा पाठपुरावा करण्यासाठी प्रोत्साहन दिले. अरबी समुद्रात पारंपरिक नौकेतून केलेल्या प्रवासादरम्यान या नौकेवरील कर्मचाऱ्यांनी दर्शवलेल्या समर्पित व व्यावसायिक वृत्तीचे पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाइस ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी कौतुक केले. संकल्पना मांडण्यापासून संशोधनापर्यंत आणि आरेखनापासून पारंपरिक जहाज बांधणी, कर्मचारी प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष प्रवासात कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांचीही त्यांनी प्रशंसा केली.
आधुनिक संरचनात्मक बळकटीशिवाय पारंपरिक पद्धतीने बांधलेली लाकडी नौका समुद्रात चालवण्यासाठी काटेकोर नियोजन, नौकानयन कौशल्य, संघटन कौशल्य आणि सहनशीलता आवश्यक असते. हा यशस्वी प्रवास म्हणजे भारतीय नौदलाचे उल्लेखनीय यश आहे.
आयएनएसव्ही कौंडिण्य भारतात परत आल्यानंतर नौकांचे दिमाखदार संचलन आणि पारंपरिक जल सलामीद्वारे तिचे स्वागत करण्यात आले. यावेळी नौदल तळावर उत्साहाचे व जल्लोषाचे वातावरण होते. हा क्षण भारतीय सागरी वारशाचा अभिमान व कर्मचाऱ्यांच्या यशाला दाद देण्याचा होता.
मुंबईतील ओमानच्या दूतावासाचे महावाणिज्यदूत महबूब इस्सा अलरैसी, वरीष्ठ अधिकारी, निवृत्त अधिकारी, ' खलाशी समुदायाचे सदस्य, ऐतिहासिक तज्ज्ञ आणि उत्साही नौकाचालक यावेळी उपस्थित होते.
आयएनएसव्ही कौंडिण्य ही भारतीय नौदलाची 20 मीटर लांब, अजिंठा लेण्यांमधील 5 व्या शतकातील शिल्पापासून प्रेरणा घेऊन, पारंपरिक पद्धतीने बांधलेली नौका आहे. ही नौका प्राचीन भारतीय जहाजबांधणी तंत्रज्ञानाचा वापर करुन बांधण्यात आली आहे. यामध्ये लाकडी फळ्या दोरखंडाच्या साह्याने एकमेकांना बांधलेल्या असून त्या नैसर्गिक चिकट द्रव्यांनी चिकटवलेल्या आहेत.
ही नौका भारताच्या समृद्ध सागरी परंपरेचे प्रतिनिधीत्व करते. ही नौका 2025 च्या मे महिन्यात भारतीय नौदलात समाविष्ट झाली आणि विख्यात दर्यावर्दी कौंडिण्य यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तिला कौंडिण्य असे नाव देण्यात आले. ही नौका म्हणजे भारताची ऐतिहासिक सागरी प्रवास परंपरा आणि हिंद महासागरातील सांस्कृतिक संबंध यांचे प्रतीक आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा