बाळू दादांची पंच्याहत्तरी- डॉ. शरीफ गिरकर

बाळू दादांची पंच्याहत्तरी
--------

डॉ. शरीफ गिरकर 
९३७०८५०९६७,९४०४४४९५३९
-------
१ डिसेंबर, वर्षाच्या शेवटच्या महिन्यातील पहिला दिवस. आज आमच्या बाळू दादांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस. पूर्ण नाव नारायण पुंडलिक अनभवणे, परंतु शाळेपर्यंत व काही सरकारी कामपर्यंतच ही नामावली मर्यादित राहिली. फक्त बाळू दादा  या नावानेच ते सर्वपरिचित आहेत. लहान थोरांचे बाळू दादा ! 
फार स्थूल नाही पण काटक बांधा ६ फुटापर्यंतची उंचपुरी शरीरयष्टी व तेवढाच करारी आवाज. आमचे बाळू दादा हे कोकणातल्या फणसाप्रमाणे गोड आहेत. बाहेरुन काटेरी पण आतुन मुलायम. अनोळखी माणसाला त्यांच्या आवाजाची भिती वाटते. जे बोलायचे ते रोखठोक व वरच्या पट्टीत, आम्हा सर्वांना त्यांच्या स्वभावाची सवय झाली आहे. पण अनोळखी माणसाला बाळू दादाची भिती वाटते, असो. माणूस मनाने श्रीमंत. भर जवानीत आमच्या बाळू दादांनी कष्टाची, मेहनतीची कामे भरपूर केली. चिऱ्यांची कामे करुन घरबांधणीमध्ये त्यांचा हातखंडा होता. दुर्दैवाने या काळात त्यांना दारुचे प्रचंड व्यसन जडले. २४ तास दारु, त्यामुळे कुटुंबाची हेळसांड होऊ लागली. अशाही परिस्थितीत त्यांच्या पत्नीने त्यांना मोलाची साथ दिली. त्यांचा स्वभाव चांगला असल्याने पुष्कळ लोकांनी त्यांना दारु सोडण्याचा सल्ला दिला. परंतु व्यसन काही सुटत नव्हते. अशा वेळी आम्हा मोंडवासीयांचे लाडके, आदरणीय डॉक्टर अण्णासाहेब पोकळे यांनी त्यांना आपल्या घरी बोलावून दारुचे व्यसन सोडण्याची विनंती केली मात्र तरीही त्यांनी त्यांचे ऐकले नाही. एक दिवस मजुरी निमित्त ते शेजारच्या वानिवडे गावात गेले होते, होडीने घरी येताना त्यांना कळले की, आदरणीय अण्णा आम्हा सर्वांना सोडून गेले. लागलीच त्यांच्या मनात विचार आला, या सदगृहस्थाचे म्हणणे मी त्यांच्या जिवंतपणी ऐकले नाही, परंतु या क्षणी मी असा निर्धार करतो की, यापुढे दारुच्या थेंबाला ही स्पर्श करणार नाही. होडीतून मोंडला उतरले व खरच आपली भीष्मप्रतिज्ञा पूर्ण केली. खरच त्याच्या जीवनात एक मोठी क्रांती झाली. आजकाल व्यसनी मुलांची संख्या फार मोठी आहे. आम्ही त्यांना बाळू दादांची आठवण करुन देतो व त्यांचा आदर डोळ्यासमोर ठेवायला सांगतो, असो. 
पहिल्यापासून ते एक निष्ठावंत शिवसैनिक. दोन वेळा पंचायत समिती निवडणूक लढवली व मोठ्या मताधिक्याने आमच्याच मतदारसंघातून निवडून आले. थोर समाजसेवकाप्रमाणे त्यांनी लोकांची सरकारी कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या सच्चा शिवसैनिकावर काही वेळा प्राणांतिक हल्लाही झाला. त्यातूनही ते ईश्वराच्या कृपेने सहिसलामत सुटले. सदैव ते निष्ठावान शिवसैनिक म्हणूनच वावरले. पैशाच्या लोभापायी निष्ठा विकली नाही. विचारांशी, तत्वांशी, प्रतारणा कधी केली नाही. मोंड गावच्या सहकारी सोसायटीचे ते अनेक वर्षे चेअरमन होते. अजूनही गेली अनेक वर्षे ते रेशनिंग दुकान चालवत आहेत. गोरगरिबांबद्दल प्रचंड प्रेम आदर मनात भरला आहे. 
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबियांनी त्यांच्या राहत्या घरी छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला पंचक्रोशीच्या लोकांनी आवर्जून उपस्थिती लावली. त्यात बालगोपाळ, विविध राजकीय पक्षांची मंडळी, मोंड गावातील त्यांचे मित्रगण असे सर्वच त्यांच्या सोहळ्यात सामील झाले होते. 
या वयातही त्यांची तत्परता, उत्साह पाहता ते ७५ वर्षांचे वाटत नाहीत. आज वाढदिवसानिमित्त परिधान केलेल्या ड्रेसमध्ये स्वारी भलतीच खुश दिसत होती. या आनंद सोहळ्यात आम्ही एकत्र जमलो हे आमचे भाग्य !  ईश्वर त्यांना नेहमी खुश ठेवो, त्यांना पुढील आयुष्य निरामय, उदंड देवो हीच माझी ईश्वराकडे मनोकामना. 
------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही