पदवीधर मतदारसंघासाठी दरवेळी नावनोंदणी करण्याची पध्दत रद्द करा, माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते यांची मागणी

पदवीधर मतदारसंघासाठी दरवेळी नव्याने नावनोंदणीची अट जाचक, दर निवडणुकीला नोंदणी करण्याची पध्दत रद्द करा, 
माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते यांची मागणी 
मुंब्रा - पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणी करण्यासाठी दर निवडणुकीत स्वतंत्रपणे मतदारांना संपूर्ण प्रक्रियेचे पालन करुन नाव नोंदवावे लागते. सर्वसाधारण निवडणुकीसाठी एकदा मतदारनोंदणी केल्यावर ते नाव कायमस्वरुपी राहते मात्र पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीसाठी दर निवडणुकीला नावनोंदणी का करावी लागते, असा प्रश्न ठाण्याचे माजी उपमहापौर तथा शिवसेनेचे मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख राजेंद्र साप्ते यांनी उपस्थित केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाने विचार करावा व या पध्दतीचा पुनर्विचार करावा अशी मागणी साप्ते यांनी केली आहे. 
सध्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणीची लगबग सुरु आहे. विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पदवीधरांना या मतदारसंघात मतदार नोंदणी करण्यासाठी आवाहन करत आहेत. इच्छुक पदवीधर मतदारांना आपले नाव नोंदवण्यासाठी यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेचे पालन करावे लागत आहे. पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी प्रथमतः मतदारयादीत नाव असणे अनिवार्य आहे. याबाबत साप्ते म्हणाले, जेव्हा सर्वसाधारण मतदारयादीत नावनोंदणी झाल्यावर ते नाव पुन्हा नोंदवावे लागत नाही मग पदवीधर मतदारांसाठी वेगळा न्याय का लावला जातो, एकदा विद्यार्थ्याने पदवी घेतल्यावर आयुष्यभर ती पदवी त्याच्यासोबत असते. असे असताना दर निवडणुकीसाठी नव्याने नोंदणी करण्याची पध्दत गोंधळ निर्माण करणारी आहे, असा आक्षेप त्यांनी घेतला. मुळात पदवीधर मतदार यादीत नोंदणी करण्याबाबत मतदार उदासीन असतात, नेहमीच्या नोंदणीपेक्षा जास्त कागदपत्रे जमवून ते एकदाची नोंदणी करतात मात्र त्यांना  एकाच कामासाठी दर सहा वर्षांनी नव्याने सर्व प्रक्रिया करावी लापते. परिणामी पदवीधरांची संख्या मोठी असताना पदवीधर मतदारांची संख्या अत्यंत कमी असते. त्यामुळे बहुसंख्य पदवीधर या मतदानापासून दूर राहतात. 
खऱ्या अर्थाने पदवीधर मतदारसंघाचा प्रतिनिधी हा पदवीधरांचा प्रतिनिधी ठरण्यासाठी बहुसंख्य पदवीधरांनी या निवडणुकीसाठी नोंदणी करणे गरजेचे आहे त्यासाठी या प्रक्रियेचा पुनर्विचार करावा अशी मागणी राजेंद्र साप्ते यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही