पालिका शाळांचे भगवेकरण थांबवा- आमदार रईस शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी -धर्माच्या आधारावर विद्यार्थी स्पर्धांना शेख यांनी केला ठाम विरोध

पालिका शाळांचे भगवेकरण थांबवा-  आमदार रईस शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
                     -धर्माच्या आधारावर विद्यार्थी स्पर्धांना  शेख यांनी केला ठाम विरोध
 
मुंबई प्रतिनिधी - 
मुंबई महापालिकांच्या शाळांमध्ये ‘प्रभू श्रीराम’ विषयांवर निबंध, चित्रकला व कवितालेखन स्पर्धा आयोजित करण्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पालिका प्रशासनाला दिलेल्या निर्देशांना समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी’चे आमदार रईस शेख यांनी ठाम विरोध केला आहे. आमदार शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रविवारी पत्र दिले असून मुंबई महापालिका शाळांचे भगवीकरण रोखण्याबाबत हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
 
राज्याचे कौशल्‍य, रोजगार, उद्योजगता व नावन्‍यिता मंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्‍त  इक्बाल सिंह चहल यांना दि. १५/१२/२०२३ रोजी  पालकमंत्री  या अधिकारात  पत्र पाठवले आहे. ‘प्रभू रामाची २२ जानेवारी २०२४ रोजी अयोद्ध्येत प्रतिष्ठापना होत असून त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्वाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून पालिका शाळामध्ये ‘प्रभू श्रीराम’ विषयांवर निबंध, चित्रकला व कवितालेखन स्पर्धा आयोजित करावी, असे निर्देश  लोढा यांनी पत्रात दिले आहेत.
 
 लोढा यांच्या निर्देशांना आमदार शेख यांनी ठाम विरोध केला आहे. मुंबई पालिका शाळांमध्ये सर्वधर्मीय विद्यार्थी शिक्षण घेतात. ज्या शिक्षण संस्थेचे प्रशासन राज्य चालवते किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळते ,अशा संस्थेत धार्मिक शिक्षण- कार्यक्रम- उपक्रम राबवण्यास भारतीय संविधान मान्यता देत नाही. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २८ (१) नुसार शिक्षणापासून धर्म वेगळा केलेला आहे. राज्य सर्व धर्मांचे समान रक्षण करते, सर्व धर्माप्रती तटस्थता आणि निःपक्षपातीपणा राखते तसेच कोणत्याही एका धर्माला राज्य धर्म मानत नाही, असे भारतीय संविधान सांगते, याकडे आमदार शेख यांनी पत्रात लक्ष वेधले आहे.
 
पालकमंत्री लोढा यांना शिक्षण विभागाच्या विषयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचा दावाही आमदार शेख यांनी पत्रात केला आहे. ते म्हणतात की, ‘७४ व्या घटना दुरुस्तीनुसार जिल्हा नियोजनासाठी जिल्हा नियोजन समित्या अस्तित्वात आल्या. या समितीचे पालकमंत्री अध्यक्ष असतात. जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लागावेत व प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यातील दुवा म्हणून पालकमंत्री काम करतात. शासनाच्या इतर विभागाकडे असलेल्या विषयासंदर्भातील निर्णयाचे अधिकार पालकमंत्री आपल्या हाती घेऊ शकत नाहीत,’ असे आमदार शेख यांनी स्पष्ट केले आहे.
 
‘मुंबई महापालिकेत मी १० वर्षे नगरसेवक राहिलो आहे. यापूर्वी ‘सूर्यनमस्कार’, ‘वंदे मातरम्’ अनिवार्य करण्याचा मुंबई महापालिका शाळांमध्ये प्रयत्न झाला होता. तेव्हा नगरसेवकांनी सभागृहात चर्चा केली आणि शिक्षणामध्ये धर्माला आणू नये असा निर्णय केलेला आहे. सद्यस्थितीत पालिकेत नगरसेवक नाहीत. यापूर्वी सर्व नगरसेवकांनी चर्चा करून घेतलेला निर्णय कायम आहे आणि तो आजही ग्राह्य धरला पाहिजे, अशी मागणी आमदार शेख यांनी पत्रात केली आहे.
 
‘मी सर्व धर्मांचा आदर आणि सन्मान करतो. मात्र मुंबई पालकमंत्री लोढा यांनी स्वत:ची अधिकार कक्षा ओलांडून पालिका प्रशासात चालवलेली ढवळाढवळ बंद करण्याबाबत आणि पालिका शाळांचे सुरु केलेले शिक्षणाचे भगवीकरण थांबवण्याबाबत आपण हस्तक्षेप करावा', अशी मी मागणी आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रात केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही