शालेय पोषण आहारात प्रति अंड्यासाठी 7 रूपये द्या, - कमलताई परुळेकर यांची मागणी

 शालेय पोषण आहारात प्रति अंड्यासाठी 7 रूपये द्या, 

-  कमलताई परुळेकर यांची मागणी 

लोकमानस प्रतिनिधी -  

शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना म्हणजेच पूर्वीची शालेय पोषण आहार योजना नाविन्यपूर्ण बनवावी असे केंद्रीय आदेश आल्यामुळेच शालेय शिक्षण विभागाने 7 नोव्हेबरला एक शासन आदेश काढला व यापुढे 23 आठवडे नियमित आहारा व्यतिरिक्त 1 ली ते 8 वीच्या शालेय विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा उकडलेले अंडे द्यावे व न खाणार्‍या  विद्यार्थ्यांना केळे द्यावे, असा आदेश काढला. 

अंडी  7 रूपयाला एक या दराने मिळते  व केळी 50 रुपये डझन या दराने मिळतात. म्हणजे एक केळे 4 रुपये 20 पैशाला पडणार.ते बाजारातून आणणे वगैरे खर्च आहेच.  परंतू, ते एक वेळ परवडू शकेल मात्र अंड्याचा खर्च पाच रुपयात होणे अशक्य आहे.  बाजारात जाणे,चांगली अंडी मिळवणे, ती उकडण्याचा खर्च आणि मजुरी हे सर्व 5 रूपयात होत नाही हे सरकारला कळत नाही का? असा प्रश्न शालेय पोषण आहार संघाच्या अध्यक्षा कमलताई परुळेकर व उपाध्यक्ष सूर्यकांत सावंत  यांनी उपस्थित केला आहे. 

पहिल्या टप्प्यात एक महिन्याचा अंडी केली खर्च शाळांना अग्रीम दिला जाईल असे जी आर मध्ये नमूद असले तरीही कोणा शाळेकडे तो निधी आलेला नाही, अशी माहिती परुळेकर यांनी दिली. दर दोन महिन्यानी  पैसे अदा केले जातील,  असे परिपत्रकात म्हटले आहे. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवून सरकार नामानिराळे  राहात आहे, असा आरोप त्यांनी केला. 

   शिक्षण मंत्री व अधिकारी याना विनंती आहे की,बाजारभाव पाहूनच त्यांनी  योजना आखावी. जिथे 200 मुले जेवतात, त्या स्वयंपाकीला आठवड्याला 1400 रूपयाप्रमाणे दोन महिन्याचे 12 हजार अंड्यासाठी खर्च करावे लागतील, आणि दोन महिन्यानी सरकार पैसे देईलच याचीही खात्री नाही. मुळात हा आतबट्ट्याचा व्यवहार स्वयंपाकींनी करू नये, असे शालेय पोषण आहार संघाने आवाहन  केले आहे.

  अंडी पुलाव,अंडी बिर्याणी करायची तर त्यासाठी स्पेशल मसाला लागणार. कमी अंडी वापरून, तो खर्च मसाल्यावर घालून वरील पर्याय शोधावा लागेल. पण पैसे आगावू हातात मिळाल्याशिवाय  कोणीही हा प्रयोग करणार नाही असा इशाराही शिक्षणाधिकारी याना संघाने दिला आहे. संघाच्या अध्यक्ष कमलताई परुळेकर  आणि उपाध्यक्ष सूर्यकांत सावंत यानी प्रसिध्दीपत्रक काढून सरकारचा समाचार घेतला आहे. 23 आठवड्यांनी कुपोषण थांबेल असे कशाचे आधारे सरकार म्हणते, ते त्यानी जाहीर करावे, असे त्यांनी आवाहन केले आहे. 

--------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही