दिवंगत कर्मचाऱ्याच्या पत्नीला कंपनीकडून मिळवून दिली १६ लाख रुपयांची मदत, भारतीय कामगार सेनेच्या पाठपुराव्याला यश

दिवंगत कर्मचाऱ्याच्या पत्नीला कंपनीकडून  मिळवून दिली १६ लाख रुपयांची मदत,  

भारतीय कामगार सेनेच्या पाठपुराव्याला यश

मुंबई - प्रतिनिधी 

भारतीय कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे विमानतळावर काम करणाऱ्या दिवंगत कर्मचाऱ्याच्या पत्नीला दिवाळीच्या तोंडावर १६ लाख ६० हजार रुपयांची मदत मिळवून देण्यात यश आले आहे. मुंबई विमानतळावरील इंडिगो एअरलाइन्सशी संलग्न असलेल्या एजाईल एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील मृत कामगार कै. विजय लक्ष्मण वाकचौरे यांच्या पत्नीला कंपनीकडून १६ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक मदत म्हणून मिळवून देण्यात भारतीय कामगार सेनेला यश मिळाले आहे. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून कंपनीतील कामगारांनी जमा केलेले १ लाख रुपये, असे मिळून एकूण १७ लाख ६० हजार रुपयांचा धनादेश दिवंगत कामगाराच्या पत्नीला भारतीय कामगार सेनेचे​ अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री, खासदार अरविंद सावंत, शिवसेना व युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई, भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्या हस्ते ​भावपूर्ण वातावरणात देण्यात आले. ​त्यामुळे त्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू तरळले. भा.का.से.च्या पाठपुराव्यामुळेच ही आर्थिक मदत मिळाल्याची भावना पत्नीने व्यक्त केली.

दिवाळी साजरी करताना सर्वत्र उत्साहाचे व मांगल्याचे वातावरण असते मात्र ज्या कामगारांचे निधन झाले आहे त्यांच्या घरातील वातावरण लक्षात घेऊन भारतीय कामगार सेनेने दिवाळीच्या सुरुवातीला अशा कामगारांच्या कुटुंबियांना दिवाळी भेटवस्तू व आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. गेल्या सहा वर्षांपासून भारतीय कामगार सेनेच्या वतीने मृत कामगारांच्या कुटुंबाला दिवाळी भेटवस्तू तसेच आर्थिक मदत देण्यात येते. गेल्या वर्षभरात दुर्दैवी मृत्यू झालेल्या २२ मृतांच्या कुटुंबियांना भावपूर्ण वातावरणात ही मदत देण्यात आली व त्यांच्यासोबत पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला. कर्मचाऱ्याचे निधन झाले असले तरी संघटना म्हणून भा.का.से. नेहमीच आपल्या कुटुंबियांसोबत असल्याचा विश्वास त्यांना देण्यात आला. 

भा.का.से. तर्फे अंधेरीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यालयाच्या प्रागंणात एका छोटेखानी समारंभात दिवाळी भेट देण्याचा कार्यक्रम पार पडला.  यावेळी संजय कदम म्हणाले,  "कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यावर कुटुंब उघडे पडते, त्यामुळे अशा विपरीत परिस्थितीत आपण सर्वांनी एकत्र येऊन त्या कामगाराच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे" अशी भावना संजय कदम यांनी यावेळी व्यक्त केली​.  याप्रसंगी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस योगेश आवळे, संतोष कदम, सुर्यकांत पाटील, राजा ठाणगे, सहचिटणीस मिलिंद तावडे, युनिट कमिटी व कामगार उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही