सेक्युलॅरिझमच्या नावावर मुस्लिम समाजासोबत आजपर्यंत राजकीय फसवणूक - खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप

इंडिया आघाडीला विजयी व्हायचे असेल तर एमआयएम व इतर पक्षांना कमी लेखून चालणार नाही,
सेक्युलॅरिझमच्या नावावर मुस्लिम समाजासोबत आजपर्यंत राजकीय फसवणूक - खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप
मुंब्रा - प्रतिनिधी
इंडिया आघाडीला येत्या लोकसभा निवडणुकीत विजयी व्हायचे असेल तर एमआयएम व इतर पक्षांना कमी लेखून चालणार नाही, आम्हाला आमचा राजकीय हिस्सा मिळणे गरजेचे आहे, असे मत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी मुंब्रा मध्ये आयोजित मेळाव्यात व्यक्त केले. आजपर्यंत सेक्युलॅरिझमच्या नावावर मुस्लिम समाजासोबत राजकीय फसवणूक झाली आहे, यापुढे अशी फसवणूक सहन केली जाणार नाही व आमची ताकद दाखवून दिली जाईल, असे खा. जलील म्हणाले.
मुस्लिमांना तिकीट दिल्यास दुसऱ्या समाजाची मते मिळत नाहीत असा आक्षेप नेहमी घेऊन उमेदवारी देण्यास टाळाटाळ केली जाते.  त्यांची मते मिळत नाहीत तर आमची मते तरी तुम्हाला का द्यायची असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कॉंग्रेस राष्ट्रवादी ला मते दिली तरी शिवसेना भाजपा विजयी होते, तुमचे मत वाया जात होते, एकदा आम्हाला संधी देण्याचे आवाहन केले व मुस्लिम समाज आमच्या पाठीशी उभा राहिला तर आम्हाला विजय मिळाला व एमआयएमचा खासदार लोकसभेत गेला. आम्ही सेक्युलॅरिझमचा ठेका घेतलेला नाही, असे त्यांनी ठणकावले. मुंब्रा कौसा ची परिस्थिती बघून वाईट वाटते ही परिस्थिती बदलण्यासाठी आमच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन त्यांनी केले. सध्याचा काळ हा शाहरुख खानचा आहे,  धर्मेंद्र व जितेंद्रचा काळ आता गेला, असा टोला त्यांनी लगावला. राजकीय सत्तेसाठी देशात वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. धर्म-जातीमध्ये वाद वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यापासून सर्व धर्म व जातीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे.
1980 पासून मुस्लिमांचे राजकारणातील प्रतिनिधित्व कमी होत आहे ही परिस्थिती बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

 एमआयएमतर्फे मुंब्रा कौसा परिसरात सहा कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले व नेत्यांची मिरवणूक काढण्यात आली. पक्षाचे मुंब्रा अध्यक्ष सैफ पठाण, माजी नगरसेवक शाह आलम आझमी यांनी या मेळाव्यासाठी पुढाकार घेतला होता. यावेळी राष्ट्रीय प्रवक्ता माजी आमदार अॅड वारीस पठाण, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सय्यद मोईन, मुंबई अध्यक्ष रिझवाना खान, प्रदेश महिला कार्याध्यक्षा रुबिना शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


वारीस पठाण म्हणाले, शिवसेनेसोबत गेलेले राष्ट्रवादीचे नेते आमच्यावर बी टीम असल्याचा आरोप करतात हे हास्यास्पद आहे. राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पडत चालले आहे. केवळ मुस्लिम विरोध करण्यासाठी इस्राईलला पाठिंबा दिला जात आहे मात्र मणिपूरमधील घटनांवर सोयिस्करपणे मौन बाळगले जाते हा दुटप्पीपणा आहे.
भाजप सरकारच्या काळात सर्वाधिक मुस्लिम विरोध वाढल्याची टीका त्यांनी केली. कर्नाटकात एका मुलाने पॅलेस्टिनला पाठिंबा देणारे स्टेटस ठेवल्याने त्याविरोधात कर्नाटकात गुन्हा दाखल करण्यात आला, हे कॉंग्रेसचे खरे रुप आहे. कॉंग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीने पॅलेस्टिनला पाठिंबा दिला आहे, तर कर्नाटक पोलिस त्याविरोधात गुन्हा दाखल करणार का, असा प्रश्न पठाण यांनी उपस्थित केला. पक्षाचे मुंब्रा अध्यक्ष सैफ पठाण यांनी भाषणात मुंब्रा शहराच्या विकासाकडे विद्यमान लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. मुंब्रावासीयांच्या समस्या सोडवण्यासाठी एमआयए नेहमी तत्पर राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही