राजकारणातील हिरा, आकाशाला गवसणी घालूनही जमीनीवर पाय असलेला सात्विक नेता - सुरेश प्रभू

राजकारणातील हिरा,  
आकाशाला गवसणी घालूनही जमीनीवर पाय असलेला सात्विक नेता - सुरेश प्रभू
--------------- 

माजी केंद्रीय मंत्री मा. सुरेश प्रभू यांची मालवणमध्ये नुकतीच भेट झाली, त्या भेटीबाबत  डॉ. शरीफ गिरकर यांनी व्यक्त केलेल्या भावना... 

::::

आज 20 सप्टेंबर 2023 , आज माझ्या आयुष्यात असा एक सुवर्णक्षण आला ज्याचे मी शब्दांत वर्णन करु शकत नाही.  त्याचे झाले असे,  माझा मुलगा खलील गिरकर पत्रकार आहे,  त्याचे आपले सर्वांचे लाडके नेते माजी केंद्रीय मंत्री आदरणीय सुरेशजी प्रभू यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत.  खलीलकडून कळले की प्रभू साहेब गणेशोत्सवासाठी त्यांच्या मूळ गावी मालवण मुक्कामी आलेले आहेत.  त्यांच्याशी संपर्क साधून खलीलने त्यांची वेळ घेतली.  त्यानंतर आम्ही सर्व सहकुटुंब त्यांच्या मूळ गावी रवाना झालो. त्यांच्या सूनेने सुहास्य वदनाने आमचे सर्वांचे स्वागत केले.  प्रभू साहेब बाप्पांच्या विसर्जनाला गेले असून ते थोड्याच वेळात येतील तोपर्यंत तुम्ही घरात बसून घ्या,  अशी आग्रहाची विनंती केली. 
कोकणातल्या सर्वसाधारण घराप्रमाणे त्यांचे घर, साधेसे मात्र नीटनेटके व घरात प्रसन्न वातावरण.  
थोड्याच वेळात विसर्जन सोहळा आटोपून सर घरात आले व विनम्रपणे स्मितहास्याने त्यांनी आमचे सर्वांचे स्वागत केले. आम्हा सर्वांची ओळख करुन घेतली व त्यांच्या पत्रकार संपादक असलेल्या पत्नी व सुनेची ओळख आम्हाला करुन दिली.  ते घरात आल्यापासून मी प्रत्येक क्षण अनुभवत होतो. काहीतरी नवीन मिळाल्याचा आनंद,  काहीशी आतुरता,  एवढ्या मोठ्या माणसाशी संवाद साधताना झालेली माझी मनाची चलबिचलता आणि सोनेरी क्षण मिळाल्याचे आत्मिक सुख यामध्ये काही क्षण आपसूकच निघून गेले.  शिल्लक राहिले ते काय तर समोर बसलेली प्रभू सरांची सात्विक मूर्ती,  बोलण्यातील सहजता व निरागसता...  विद्वत्तेचा,  लोकप्रियतेचा, मोठेपणाचा कुठेही लवलेश देखील नाही, आयुष्यातील एवढ्या मोठ्या उत्तुंग भरारीमध्ये देखील पाय मात्र सतत जमीनीवरच. थोड्याच वेळात त्यांनी आपल्या सहज संभाषणाने त्यांनी आपलेसे करुन टाकले.  त्यामुळे आपण दिल्ली गाजवणाऱ्या एका मोठ्या केंद्रीय मंत्र्याला, थोर समाजसेवकाला भेटत आहोत, समोरासमोर बोलत आहोत असे अजिबात वाटले नाही.  संभाषणाच्या ओघात ते म्हणाले,  मी मोठेपणाचा आव कधीही आणला नाही,  मी वृत्तीने धार्मिक व आस्तिक असून धर्माभिमानी आहे मात्र दुसऱ्या धर्माचा द्वेष माझ्या मनाला कधीच शिवला नाही.  माझ्याने होणारी कामे मार्गी लावण्याचा मी नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केला. न होणाऱ्या कामाचे कधीही श्रेय घेतले नाही.  राजकारणात राहून लाच कधीही घेतली नाही व कधीही दिली देखील नाही.  लोकांवर मनापासून प्रेम केले त्यामुळे लोकही मला भरभरुन प्रेम देतात.  हीच मी कमावलेली माया आहे,  अमूल्य असा ठेवा आहे असे मी समजतो,  असे ते म्हणाले. 
सुरेश प्रभू यांच्या सान्निध्यात घालवलेली ती उणीपुरी दहा मिनिटे मात्र या इवल्याशा वेळात जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन,  त्यांची सदसदविवेक बुध्दी,  सचोटी,  प्रामाणिकपणा अशा सात्विक जीवनाचे यथार्थ चित्र त्यांनी आमच्यापुढे उभे केले. 
पूर्वीच्या ऐतिहासिक राजापूर लोकसभा मतदारसंघात आमचा जन्म झाला.  बँ. नाथ पै,  नाना दंडवते , सुरेशजी प्रभू यांच्या सारखी रत्ने ईश्वराने देऊन आम्हाला उपकृत केले हे खरेच आमचे व मतदारसंघाचे भाग्य. 

अंकगणितानुसार एखाद्या आकड्याच्या डाव्या बाजूच्या शुन्यांना काहीही किंमत नसते मात्र तीच शून्ये जेव्हा आकड्यांच्या उजव्या बाजूला असतील तर योग्यतेप्रमाणे त्यांची किंमत वाढत जाते.  ती दशक असू शकते किंवा कोटी, अब्ज देखील असते. एवढे त्या उजव्या बाजूच्या शुन्याला महत्त्व आहे. देशाची लोकसंख्या 140 कोटीपेक्षा जास्त आहे असे असताना सुरेश प्रभूंसारखी पाच पन्नास माणसे देशात असतील तर देशाचा सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही. कारण अशा लोकांच्या विद्वतेने एवढी उंची गाठलेली असते की कोटी,  अब्ज च्या शुन्याला देखील तेवढी किंमत उरत नाही.  असो. 

ईश्वर उदंड, निरामाय, निरोगी आरोग्य देवो व उत्तरोत्तर त्यांच्याकडून समाजोपयोगी सेवा होत राहीवी हीच सुरेश प्रभूंसाठी प्रभूकडे प्रार्थना.
----------
डॉ. शरीफ हसनखान गिरकर,  
मु. पो. मोंड, ता. देवगड,  जि. सिंधुदूर्ग
9370850967

टिप्पण्या

  1. खरंच देवमाणूस ! कारण देवच अश्या सर्व गुणांनी युक्त असू शकतो 🙏

    उत्तर द्याहटवा
  2. साहेबांच्या सानिध्यात व मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला देखील मिळाली. साहेब म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे मूर्तिमंत उदाहरणच. साहेबांचे ज्ञान व अनुभव पाहता बरेचसे उच्च उद्योगपती साहेबांना सल्ला घेण्यासाठी बोलवत असत.
    एकदा पुण्यात साहेबांना एका मोठ्या उद्योगपतींनी एक आलिशान गाडी पाठवली होती, साहेबांनी त्या प्रवासादरम्यान गाडी चालकाशी आपुलकीने संवाद साधला व त्यानंतर ते त्यांच्या बैठकीस निघून गेले. साहेबांना सोडल्या नंतर गाडी चालकाने माझ्याजवळ आपली भावना व्यक्त केली. तो म्हणाला की, "आत्ता पर्यंत बरेच सुप्रसिद्ध अभिनेता-अभिनेत्री, क्रिकेटपटू, मोठे उद्योगपती व नेत्यांसोबत प्रवास केले आहे, परंतु माननीय सुरेश प्रभुजी अगदी सहज जिव्हाळ्याचे वाटले, एवढ्या आपुलकीने विचारपूस केल्याने मला गहीवरून आले. प्रभु म्हणजे देव. आणि असा हा देवासारखां लोकनेता हा आपल्या मराठी मातीत जन्माला आहे ही खुप अभिमाना ची गोष्ट आहे. "
    Siddheshwar Bhagat.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही