कोकणातील पायाभूत विकासाला प्राधान्य - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोकणातील पायाभूत विकासाला प्राधान्य                        - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लोकमानस प्रतिनिधी 
            मुंबई :- राज्यातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य  असून त्यामध्ये रस्त्यांची जोडणी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्या पार्श्भूमीवर कोकणाच्या गतीमान विकासासाठी त्या ठिकाणी दळणवळण सुविधांमध्ये वाढ करण्यास आणि पायाभूत सुविधा उभारण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले.

            रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण 12 रेल्वे स्थानकांचे रस्ते काँक्रिटीकरण व सुशोभिकरण करणे या कामांचा दूरदृष्यप्रणालीद्वारे भूमिपूजन शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मंत्रालयात आयोजित या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे तर संबंधति बारा रेल्वे स्थानकांवर केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्याच्या दृष्टीने रोजगार, आरोग्य, शिक्षण, दळणवळण यांसह मूलभूत सोयीसुविधा जनसामान्यांना सुलभतेने उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. देशाच्या, राज्याच्या गतीमान विकासात रस्त्यांची व्यापक सुविधा ही महत्त्वाची बाब असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील आठशे रेल्वे स्थानकांच्या कायापालटाच्या उपक्रमाची अलीकडेच सुरवात केली आहे. राज्यातील 44 स्थानकांचा त्यात समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गगरी, कुडाळ, आणि सावंतवाडी रेल्वेस्थानक यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरण व सुशोभिकरणाचे काम सुरु होत आहे, ही स्वागर्ताह बाब आहे. यामुळे कोकणाच्या पर्यटनाचा व्यापक विस्तार होण्यासाठी निश्चितच लाभ होईल. पर्यटकांना, स्थानिक रहिवाश्यांना या माध्यमातून चागंल्या सोयी सुविधा उपलब्ध होतील. त्याचसोबत कोकणातील पर्यटनवृद्धीलाही यामुळे मोठी चालना मिळेल. पर्यटन व्यवसायाला पूरक निर्सगसौंदर्याने संपन्न कोकणाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्याठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास ही काळाची गरज असून, शासनाने कोकण विकासावर लक्ष केंद्रित केले आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

 स्थानिक रोजगार संधी विस्तारण्यासाठी रेल्वे स्थानकांचे रस्ते महत्त्वपूर्ण -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोकण हे पर्यटनाच्या दृष्टीने सुंदर ठिकाण असून स्थानिक रोजगार संधी विस्तारण्यासाठी कोकणातील बारा रेल्वे स्थानकांच्या रस्ते काँक्रिटकरण व सुशोभीकरणाचे काम निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. कोकणाच्या गतिमान विकासासाठी त्याठिकाणी पायभूत सुविधांची उभारणी करण्यास शासनाचे प्राधान्य आहे. त्यासाठी स्वतंत्र विकास मंडळ करण्याची मुख्यंत्र्यांची भूमिका आहे. कोकणाला नैसर्गिक साधनसंपत्ती लाभेलली असून त्या ठिकाणच्या या साधनसंपत्तीचा, सागरी किनारे यांचा योग्य वापर झाला पाहिजे. कोकण रेल्वे ही कोकण विकासाची जीवनवाहिनी असून तेथील रेल्व स्थानकांचा कायापालट झाला पाहिजे. पर्यटक, प्रवासी यांच्या सोयीसुविधांमध्ये या माध्यमातून वाढ होणार आहे. त्याचा निश्चितच चांगला परिणाम याठिकाणच्या पर्यटन संधी वाढण्यासाठी होईल. या पार्श्वभूमीवर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तत्परतेने सात महिन्यांत ही बारा रेल्वस्थानके, रस्ते सुशोभिकरण संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. कोकणवासीयांसाठी, चाकरमान्यांसाठी हे निश्चितच उपयुक्त ठरेल. कोकणात सिंचन प्रकल्पनाची कामे ही करण्यात येणार असून काजू फळ प्रक्रिया सोबत वेगवेगळे रोजगारवृद्धीसाठीचे उपक्रम राबवण्यात येत आहेत. या सर्व माध्यमातून लवकरच कोकणाचा लक्षणीय विकास बघायला मिळेल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

 कोकण पर्यटन विकासातील महत्वाचा टप्पा - मंत्री रवींद्र चव्हाण
            सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, कोकण रेल्वे स्थानकांच्या रस्ते सुशोभिकरण कामासाठी लागणारा शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे.या कामात उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसेच कोकण रेल्व व्यवस्थापनाने  मोलाचे सहकार्य केल्याने हा उपक्रम कमी कालावधीत सुरु करता येत आहे. संबंधित रेल्व स्थानकांच्या सुशोभिकरण कामाची सुरवात हा कोकण पर्यटन विकासातील महत्वाचा टप्पा आहे. कोकणातील जिल्ह्यांना याचा निश्चितच व्यापक लाभ मिळेल, असे श्री.चव्हाण यांनी सांगितले.

      यावेळी आमदार निरंजन डावखरे, आमदार अनिकेत तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर - म्हैसकर, कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव दशपुते, कोकण विभाग सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज, वैशाली गायकवाड, कोकण भवन यांच्यासह सर्व संबंधित उपस्थित होते.

 सुविधायुक्त स्थानकांची निर्मिती
            कोकण विभागामध्ये पर्यटनास चालना देण्याकरिता  सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे स्थानकाच्या पोहोच मार्गाचे देखभाल दुरुस्ती व परिसरातील सुशोभिकरण करण्याचे नियोजन केले आहे.

            कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदुरे रेल्वे स्थानकापर्यंत एकूण ३७ रेल्वेस्थानके आहेत. एकूण ३७ रेल्वे स्थानकांपैकी पर्यटनदृष्ट्या महत्वाचे व सतत प्रवाशांची वर्दळ असणारे १२ रेल्वे स्थानकांचे काम पहिल्या टप्प्यात प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील तीन रेल्वे स्थानक वीर, माणगाव व कोलाड; रत्नागिरी जिल्ह्यातील पाच रेल्वे स्थानके चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर व खेड; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार रेल्वे स्थानके कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ व सावंतवाडी या कामांना राज्य शासना मार्फत मंजूरी प्रदान केली असून सन मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पामध्ये 12 कामांकरिता 56.25 कोटी इतक्या रक्कमेच्या कामांचा समावेश करण्यात आला असून आजमितीस या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामे सुरू करण्यात येत आहेत.

             रेल्वे स्थानक सुशोभीकरण अंतर्गत रेल्वे स्थानकांच्या पोहोच रस्त्याचे काँक्रीटकरण करणे, पथदिवे, पेव्हड शोल्डर व आर.सी.सी. गटर्स बांधणे. महिला व पुरुष प्रवाशांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहाची बांधणी करण्याचे काम अंतर्भूत आहे. प्रवाशांसाठी स्थानक परिसरात दुकाने उभारणे,  अंतर्गत प्रवाशांसाठी प्रतीक्षालयाची  व्यवस्था करणे, ऊन पाऊस यांच्यापासून संरक्षणासाठी कायम स्वरुपी छत तयार करण्यात येणार आहे. येणाऱ्या जाणान्या प्रवाशांसाठी  आगमन निर्गमनाद्वारे सायकल दुचाकी, चारचाकी, बस व रिक्षासाठी  वाहनतळाची  व्यवस्था करण्यात येणार आहे.
            

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही