राज्यातील सर्व रस्ते तत्काळ दुरुस्त करावेत - सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांचे निर्देश

राज्यातील सर्व रस्ते तत्काळ दुरुस्त करावेत - सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांचे निर्देश

लोकमानस प्रतिनिधी 

मुंबई : अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करीत ते सुस्थितीत आणावेत. अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

 भुसे यांच्या दालनात राज्यातील सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणअंतर्गत येणाऱ्या रस्त्यावरील पथकर नाका, महामार्गावरील खड्डे, मार्गिकेची शिस्त, वेग याबाबत चर्चा, उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, अपर पोलीस महासंचालक रवींद्र सिंघल (वाहतूक), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक संजय यादव, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुंबई विभागाचे प्रादेशिक अधिकारी ए. श्रीवास्तव यांच्यासह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री भुसे म्हणाले की, रस्त्यांवरील अपघातात मानवी व वित्त हानी होते. ही गंभीर बाब आहे. या पार्श्वभूमीवर अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित सर्व विभागांनी पुरेशा उपाययोजना कराव्यात. त्यासाठी वाहन चालक, नागरिकांमध्ये जनजागृती करावी. त्यासाठी टोलनाक्यांवर सुद्धा जनजागृतीपर उद्घोषणा करण्यात याव्यात. रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरावेत. रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असेल, तर वाहन चालकांच्या सजगतेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. वाहन चालकांच्या माहितीसाठी ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत. ट्रॅक्टर ट्रॉली, बैलगाड्यांना रिफलेक्टर्स लावावेत. नादुरुस्त वाहने वेळीच उचलून बाजूला करावीत.

ब्लॅक स्पॉट निश्चित करून तेथे अपघात टाळण्यासाठी सुरक्षेच्या आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. लेन कटिंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करावी. त्यासाठी परिवहन विभाग आणि पोलीस दलाची मदत घ्यावी. जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच या समितीच्या बैठका नियमितपणे घेवून संबंधित सर्व विभागांनी या बैठकीला हजर राहणे अनिवार्य असल्याचेही भुसे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तयार केलेले रस्ते व टोल वसुलीची माहिती सह व्यवस्थापकीय संचालक यादव यांनी दिली. यावेळी अपर मुख्य सचिव  म्हैसकर, अपर पोलीस महासंचालक  सिंघल, परिवहन आयुक्त  भीमनवार यांनी विविध सूचना केल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही