तुमचे मोठे प्रकल्प नको; आधी आमच्या सफाई कामगारांचे रखडलेले वेतन द्या - मर्जिया पठाण

तुमचे मोठे प्रकल्प नको; आधी आमच्या सफाई कामगारांचे रखडलेले वेतन द्या - मर्जिया पठाण 

लोकमानस प्रतिनिधी

ठाणे - शहरात जमा झालेला कचरा, पाणीसमस्या आणि मलमूत्र याची विल्हेवाट लावण्याचे काम गोरगरीब सफाई कामगार करीत आहेत.  मात्र, त्यांचे वेतन गेले तीन महिन्यांपासून अशोक इंटरप्रायजेस आणि अभिषेक इंटरप्रायजेस यांनी दिलेले नाही. त्यामुळे आम्हाला तुमचे मोठमोठे प्रकल्प नको; आधी आमच्या गोरगरीब सफाई कामगारांचे पगार द्या. अन्यथा, 2024 नंतर ठाणे पालिकेच्या सभागृहात आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया पठाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. 

मर्जिया शानू पठाण यांनी आज मुंब्रा , कौसा भागातील सफाई कामांची पाहणी केली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. या पाहणीदरम्यान शहराच्या विविध भागात कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून आले. तसेच, अनेक जलवाहिन्या नाल्यातून जात असून त्या फुटलेल्या अवस्थेत असल्याचेही दिसले. 

या वेळी मर्जिया पठाण यांनी ठाणे महानगर पालिकेच्या कारभारावर चांगलीच आगपाखड केली. त्या म्हणाल्या की, शहरात साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे रोगराई वाढली आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे पोटाचे विकार वाढीस लागले आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहेत. सफाई कामगार आपले काम अत्यंत चांगल्या पद्धतीने करीत असले तरीही सैन्य रसदेवर चालत असते. या कामगारांना गेले तीन महिने वेतनच देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या कामावरही मर्यादा येत आहेत. याबाबत संबधित ठेकेदारांना विचारणा केल्यास ते ठाणे पालिकेकडे बोट दाखवत आहेत. पालिकेकडून बिले दिली जात नसल्याने आपण कामगारांना वेतन देऊ शकत नाही, असे सांगितले जात आहे. कामगारांचे हे शोषण आम्ही खपवून घेणार नाही. येत्या 2024 मध्ये जेव्हा सभागृह सुरू होईल, तेव्हा या शोषणकर्त्यांना चांगलाच धडा शिकवू, असा इशाराही त्यांनी दिला.

लवकरच ठामपा मुख्यालयावर धडक
नगरसेवकांनी सफाईसाठी जेसीबी, डंपर , पोकलेन मागितले तरी पालिकेकडून दिले जात नाहीत. त्यामुळेच शहरामध्ये वाढणारी अस्वच्छता, सफाईची वानवा होत आहे. शिवाय,  कामगारांचे थकलेले पगार या विरोधात ठामपा आयुक्तांना जाब विचारणार आहोत. त्यासाठी लवकरच आम्ही ठामपावर धडक देऊ, असेही पठाण म्हणाल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही