शिवसेनाप्रमुखांशी रक्ताचे नाते सांगणारेच समान नागरी कायद्याविरोधात, त्यांचा खरा चेहरा समोर येत आहे, उध्दव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या भूमिकेला साजेशी भूमिका घेण्याची गरज शिवसेना खासदार राहुल शेवाळेंची फटकेबाजी

शिवसेनाप्रमुखांशी रक्ताचे नाते सांगणारेच समान नागरी कायद्याविरोधात, त्यांचा खरा चेहरा समोर येत आहे,  

उध्दव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या भूमिकेला साजेशी भूमिका घेण्याची गरज , 

शिवसेना खासदार राहुल शेवाळेंची फटकेबाजी

मुंबई - प्रतिनिधी 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याचे सुतोवाच केले आणि बाळासाहेब ठाकरे यांचे आणखी एक स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल उचलले आहे. मात्र बाळासाहेबांशी रक्ताचे नाते सांगणाऱ्या उध्दव ठाकरे यांनी या कायद्याला विरोध करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे त्यांचा खरा चेहरा राज्यातील जनतेसमोर येत आहे. खरे पाहत उध्दव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुखांच्या भुमिकेला साजेशी भूमिका घेऊन त्यांच्या विचारांचे समर्थन करण्याची गरज होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी कटीबध्द आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत केले. 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मु्ख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आज एक वर्ष झाले. आजचा हा दिवस बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नपूर्तीचा दिवस साजरा करत आहोत. निष्ठावान शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री व्हावा ही बाळासाहेबांची इच्छा भाजपच्या सहकार्याने पूर्ण झाली आहे. राम मंदिर निर्मिती करणे,  कलम ३७० रद्द करणे व समान नागरी कायदा बनवणे ही बाळासाहेबांची 3 स्वप्ने  होती. त्यापैकी दोन स्वप्ने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केली आहेत. समान नागरी कायदा लवकरच येईल. शिवसेनेचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याला पूर्ण पाठिंबा दिला आहे.  बाळासाहेबांच्या एक राष्ट्र, एक कायदा या संकल्पनेशी आम्ही कटिबद्ध आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. 
शिवसेनाप्रमुखांशी रक्ताचे नाते सांगणारेच या कायद्याला विरोध करत आहेत. या कायद्याबाबत गैरसमज पसरवत आहेत.  त्यांचा खरा चेहरा समोर येत आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे शिष्टमंडळ नुकतेच उध्दव ठाकरेंना भेटण्यासाठी सेना भवनमध्ये गेले होते. उद्धव ठाकरे मुस्लिमांना पाठिंबा देतील असा विश्वास मुस्लिमांना आहे. या कायद्यामुळे हिंदूना त्रास सहन करावा लागेल असे ते म्हणत आहेत, मात्र प्रत्यक्षात हा कायदा हिंदूंना प्रभावित करणार नाही तर फक्त गांधी कुटुंबाला प्रभावित करेल, त्यामुळे उध्दव ठाकरे या कायद्याला विरोध करत आहेत, अशी टीका शेवाळे यांनी केली. या कायद्याच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे व बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण होईल, असे ते म्हणाले. 
 हा कायदा कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून प्रत्येकाला त्यांची ओळख विचारात न घेता समान वागणूक देईल, हा कायदा मंजूर होण्यासाठी आम्ही व्हीप जारी करू, असे ते म्हणाले. 
सर्वोच्च न्यायालयाने  अनेकदा देशात समान नागरी कायदा करण्याबाबत निर्देश दिले होते. मात्र तत्कालिन सत्ताधारी काँग्रेसमुळे गेली 75 वर्षे समान नागरी कायद्याची अंमलबजावणी झाली नाही, हे दुर्दैवी आहे. देशातील प्रत्येक नागरिकांसाठी व सर्व महिलांसाठी देखील हा कायदा अत्यंत चांगला आहे.  बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृ्त्वाखाली शिवसेना वचनबध्द आहे. संसदेत हे विधेयक मांडल्यावर शिवसेना त्याला पाठिंबा देईल.  आगामी पावसाळी अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या समर्थनार्थ ठराव मांडावा व केंद्र सरकारकडे पाठवावा अशी मागणी त्यांनी केली. 
कॉंग्रेसने या कायद्याला विरोध करण्यासाठी समिती नेमली आहे. या समितीचे सदस्य हुसेन दलवाई यांनी या कायद्यामुळे देशात हिंदू मुस्लिम भेदभाव होईल व मुस्लिमांचे मोठे नुकसान होईल, असे केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. 
खरे पाहता मुस्लिम महिलांसाठी हा कायदा अत्यंत लाभदायक ठरेल.  या विधेयकामुळे महिलांचे रक्षण होईल व त्यांच्यासाठी हा कायदा वरदान ठरेल, असा दावा त्यांनी केला. मुस्लिम महिलांना सुरक्षित करणारा हा कायदा ठरेल.  देशाचे दिवंगत राष्ट्रपती एपीजे कलाम यांनी देखील समान नागरी कायद्याचे समर्थन केले होते.  केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये याबाबतचा प्रस्ताव मांडावा व विधेयक मंजूर करावे अशी विनंती पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सर्व पक्षांनी या कायद्याला पाठिंबा द्यावा, धार्मिक रंग देऊ नये,  गैरसमज पसरवू नये असे आवाहन त्यांनी केले. त्याचवेळी उध्दव ठाकरेंनी देखील बाळासाहेबांच्या भूमिकेला समर्थन देणे गरजेचे आहे, समाजात दुही निर्माण करणे, हिंदुंमध्ये गैरसमज पसरवणे असे प्रकार उध्दव ठाकरे यांनी करु नयेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

समान नागरी कायदा म्हणजे काय?
सध्या आपल्या देशात पर्सनल लॉ अर्थात वैयक्तिक कायद्याचे स्वरूप गुंतागुंतीचे आहे. प्रत्येक धर्माचे या संदर्भात स्वत:चे कायदे आहेत. हिंदू, शीख, जैन, बौद्ध धर्मीयांसाठी हिंदू विवाह कायदा लागू होतो; तर ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मीयांसाठी वेगळे कायदे आहेत. आपल्या देशात सर्व धर्मांतीललोकांसाठी एकाच प्रकारचे वैयक्तिक कायदे असणे म्हणजे समान नागरी कायदा होय. लग्न, पोटगी, वारसा, घटस्फोट, मुलांचा ताबा या बाबींचा यात समावेश होतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही