मराठी मालिकांतील उगवती तारका -- "प्रणिता आचरेकर"

मराठी मालिकांतील  उगवती तारका --  "प्रणिता आचरेकर"  


अगदी अल्प काळात अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अष्टपैलू कलाकार !! 
आपल्या अभिनयाच्या विविध छटांमधून विविध रंग उधळत ती आज पुढे चालली आहे. तिच्या गुणांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

प्रणिता हे नाव ‘प्राण’ या संस्कृत शब्दावरून आले असून त्याचा अर्थ श्वास असा होतो. या नावाचे संदर्भानुसार अर्थ असू शकतात. याचा अर्थ ‘जीवनाने धन्य’ किंवा 'दीर्घायुषी' असाही होऊ शकतो.  याव्यतिरिक्त, ‘प्रेमाने भरलेला’ किंवा 'काळजी घेणारी उबदार व्यक्ती' असाही असू शकतो, थोडक्यात, प्रणिता हे मराठीत अनेक सकारात्मक अर्थ असलेले एक सुंदर नाव आहे.

प्रणिताचा जन्म खेतवाडी, गिरगांवातला. तिच्या  शालेय शिक्षणाची सुरुवात गिरगांवातील सेंट टेरेसा शाळेमधून झाली परंतु बालपणीच जागेच्या अडचणीमुळे गिरगांवातून कळवा येथे राहण्यास जावं लागलं तिथे कळवा न्यु इंग्लिश स्कुल मधून शालेय शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयीन शिक्षण 
एस.एम. शेट्टी महाविद्यालय,पवई येथून पूर्ण केलं. कळव्याला गेल्यानंतर सुद्धा तिने गिरगांवची पाळेमुळे घट्ट पकडुन ठेवली. प्रत्येक वर्षी गिरगांवातील गुढीपाडवा रॅली मधील ढोलपथकात ती आनंदाने सहभागी होत असते.
अभिनेत्री म्हणून नावारूपाला येण्यापूर्वी प्रणिता सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर म्हणून प्रख्यात होती. मालिकांच्या माध्यमातून तिने एक चतुरस्त्र अभिनेत्री म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले. तिच्या रिल्स मुळे सुद्धा ती प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

प्रणिता भरतनाट्यम नृत्य विशारद आहे. नृत्याची फार आवड असल्यामुळे ती शास्त्रीय, साल्सा, तथा पाश्चात्य नृत्य सुद्धा ती शिकली. उत्तम नृत्यांगना असल्यामुळे ती आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमधून भाग घेऊ लागली त्याचबरोबर एकांकिका सुद्धा करू लागली. एवढंच नाही तर युथ फेस्टिवल मधील लोक नृत्य या प्रकारात तिने सुवर्ण पदक पटकावले आहे इस्रायल येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय डान्स फेस्टिवल मध्ये फोकडान्स परफॉर्म करून तेथील प्रेक्षकांत आपली छाप पाडली. "बंध जुळताना" या एकांकिकेत तिने उत्तम भूमिका साकारली होती. अभिनेता सोनू सूद सोबत तिने एका जाहिरातीत सुद्धा काम केले आहे. 

स्टार प्रवाह वरील "स्वाभिमान" या मालकेद्वारे रीमा ही भूमिका साकारून सर्वप्रथम तिने मालिका विश्वात प्रवेश केला. "सातव्या मुलीची सातवी मुलगी" या मालिकेत तिने हेमा ही  नकारात्मक भूमिका साकार केली आहे. तसेच "मन धागा धागा जोडते नवा" या एका नवीन मालिकेत ती शलाका ही नकारात्मक भूमिका उत्कृष्टरित्या साकारत आहे. 

"तुझ्या रूपाचं चांदणं" या मालिकेतील ज्योती आणि "जाऊ नको दूर तू बाबा" या मालिकेतील तन्वी या भूमिका देखील तिच्या अव्वल ठरल्या. स्वतःच्या अभिनयाच्या रंगीबेरंगी छटांमधून मधून तीने अक्षरशः प्रेक्षकांना भुरळ पाडली. 
प्रणिता तिच्या खऱ्या आयुष्यात अत्यंत गोड आणि लाघवी मुलगी आहे. तिचे मनात एक तोंडावर एक असे मुळीच नसते. जे आहे ते रोखठोक ! शाकाहारी बरोबर तिला मासे, मटण असे मांसाहारी खाणेसुद्धा खूप आवडतं. तिला फिरायला देखील फार आवडते. पारंपारिक असो वा पाश्चात्य दोन्ही पेहराव घालणे तिला आवडते. दोन्ही पेहराव तिच्यावर अधिक खुलून दिसतात. 

प्रणिताला नकारात्मक भूमिका करणे जास्त आव्हानात्मक वाटते. कारण त्याच्यात आपली खरी कसोटी लागते पुढील कारकीर्दीत तिला चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे. सर्व मराठी अभिनेत्री प्रणिताला खूप आवडतात कारण प्रत्येकी कडून नेहमी काही तरी नवीन शिकायला मिळते. 

इन्फ्ल्यूएन्सर - एकांकिका - मालिका - जाहिरात असे वेगवेगळे पल्ले गाठत प्रणिताने अभिनय विश्वात उत्तुंग भरारी घेतली आहे. ईश्वरचरणी एकच प्रार्थना ! तिच्या किर्तीचा सुगंध असाच सर्वत्र बहरत राहो आणि तिच्या यशाची गुढी उंचच उंच जावो !!!

सौ. ऋतुजा तिर्लोटकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही