ठाणे महानगरपालिकेची मालमत्ता करापोटी अवघ्या 66 दिवसात 200 कोटींची विक्रमी वसुली

 ठाणे महानगरपालिकेची मालमत्ता करापोटी अवघ्या 66 दिवसात 200 कोटींची विक्रमी वसुली

 लोकमानस प्रतिनिधी 

ठाणे  : मालमत्ता कराच्या पहिल्या तिमाहीत  ठाणे महापालिकेने आर्थिक वर्षाच्या 66 दिवसात 200 कोटी रुपयांची  विक्रमी मालमत्ता कर वसुली केली आहे. ठाणेकरांनी मालमत्ता कर भरणा करण्यास दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद प्रशंसनीय असल्याचे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नमूद केले आहे.

 ठाणे महापालिकेने चालू (2023-24) आर्थिक वर्षाची देयके 01 एप्रिल 2023 रोजी तयार करुन याबाबत नागरिकांना एस.एम.एस द्वारे अवगत केले होते.  या एस.एम.एस द्वारे मालमत्ता कराची देयके डाऊनलोड करणे, प्रिंट करणे तसेच ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरण्याकरिता अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

            मालमत्ता कर नागरिकांना भरणे सोईचे व्हावे यासाठी सर्व प्रभागसमिती कार्यालयात कर संकलन केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून कार्यालयीन वेळेत तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सदर केंद्रे सुरू ठेवण्यात आली आहेत. मालमत्ता कराची देयके प्रभाग समिती निहाय सर्व मालमत्ता धारकांना वितरीत करण्यात  असून सदर मालमत्ता देयके संबंधितांना प्राप्त झालीत की नाही याची खातरजमा करुन कर भरणेबाबत आवाहन करण्यात आले. ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला  यावर्षी 900 कोटी इतके वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मालमत्ता कर वसुली विभागाने 200 कोटी इतकी मालमत्ता कर वसुली केली आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे, मालमत्ता कराची वसुलीबाबत सातत्याने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून यावर्षी 1000 कोटींची वसुली करण्याचा प्रयत्न करावी अशी अपेक्षा आयुक्त अभिजीत बांगर व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत 90 टक्के वाढ

सन 2022-23 या आर्थिक वर्षात दिनांक 7 जून 2022 रोजी 108.35 कोटींची वसुली झाली होती. त्या तुलनेत यंदा 92.22 कोटी इतकी वाढीव वसुली म्हणजेच 90 टक्के इतकी आहे. या वर्षी आतापर्यत एकूण 151536 इतक्या मालमत्ताधारकांनी कर भर भरणा केलेला आहे. 

कर वसुलीसाठी उपाययोजना

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक/ करदात्यांना मालमत्ता करसंलग्न सोयी सुविधा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यामध्ये करदाते त्यांच्या घरातून अथवा कार्यालयातून इतर ठिकाणाहून मालमत्ता करसंलग्न सर्व सोई-सुविधा  वापरु शकतील. आपल्या मालमत्तेवर किती कर प्रलंबित आहे, जर दंड लागू करण्यात आला असेल तर त्याची रक्कम किती आहे, मालमत्ता कर भरणा कोणकोणत्या पध्दतीने करता येईल अशा सर्व प्रश्नांची उत्तरे नागरिकांना महानगरपालिकेच्या वेबसाईटद्वारे घरच्या घरी मिळू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी महानगरपालिकेच्या कार्यालयात येण्याची व कोणास भेटण्याची गरज पडू नये अशा पध्दतीने प्रक्रिया सुलभ होईल याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.

प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे

मालमत्ता कर भरण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत. मालमत्ताधारकांना या केंद्रावर सोमवार ते शनिवार स. 10.00 सायं. 5.00 वा. या वेळेमध्ये मालमत्ता कर जमा करता येईल,

त्याशिवाय, ऑनलाईन कर भरणा सुविधाही कार्यरत आहे करदाते त्यांच्या देयकाची संगणकीय प्रत property tax.thanecity.gov.in या लिकद्वारे अथवा प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्रावरून उपलब्ध करून घेवू शकतील. तसेच या लिंकद्वारे इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच Google Pay. PhonePe, PayTm, BHIMApp याद्वारे करदाते ऑनलाईन पध्दतीने त्यांचा मालमत्ता कर जमा करू शकतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही