सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया - राज्यपालांचे आवाहन

सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया


महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन

लोकमानस प्रतिनिधी 

मुंबई -

सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकास घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात बोलताना केले.

राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला तसेच यावेळी राष्ट्रगीत आणि राज्यगीत गाऊन ध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी झालेल्या पथसंचलानाचे राज्यपालांनी निरीक्षण केले.

राज्यपाल  बैस यांनी यावेळी आपल्या भाषणात जगभरातील मराठी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. त्याचप्रमाणे कामगारांच्या आणि श्रमिकांच्या घामातून हा महाराष्ट्र घडल्याचा उल्लेख करून आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाबरोबरच महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशा अनेक विभूतींनी महाराष्ट्राला सामाजिकदृष्ट्या समृद्ध केल्याचे राज्यपाल म्हणाले.

राज्य शासन करीत असलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून राज्यपाल म्हणाले, कोविडनंतर अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करून रोजगार निर्मितीवर भ़र देण्यात येत आहे. राज्यात लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे. स्टार्टअप आणि इको सिस्टीम वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. कोविडच्या तीन लाटांचा नियोजनबद्ध रितीने सामना करीत महाराष्ट्राने देशात एक उदाहरण निर्माण केल्याचे सांगून राज्यातील जनतेने आपले आरोग्य सांभाळावे असे आवाहन राज्यपालांनी केले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना शासनामार्फत विविध विभागांमध्ये 75 हजार शासकीय नोकर भरतीची प्रक्रिया वेगाने सुरू असून याअंतर्गत राज्यातील पोलीस यंत्रणा सक्षम करण्यासाठी 18 हजार 331 शिपाई भरती प्रक्रियाही प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. 

मुंबईतल्या दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, स्थानिक लोकप्रतिनिधी, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इकबालसिंह चहल, शासनाच्या विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव यांच्यासह राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) देवेन भारती, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, विविध विभागांचे प्रधान सचिव, सचिव, माहिती महासंचालक जयश्री भोज यांच्यासह वरिष्ठ शासकीय आणि पोलीस अधिकारी, विविध देशांचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही