मी राष्ट्रवादीतच आहे व जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार, अजित पवारांचे स्पष्टीकरण भाजपसोबत जाण्याचे वृत्त फेटाळले

 मी राष्ट्रवादीतच आहे व जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार, अजित पवारांचे स्पष्टीकरण,

भाजपसोबत जाण्याचे वृत्त फेटाळले 

लोकमानस प्रतिनिधी 

मुंबई- 

मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात असून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच राहणार आहे, जीवात जीव असेपर्यंत पक्षाचे काम करीत राहीन. सध्या विविध वृत्तवाहिन्यांवर दाखवल्या जात असलेल्या माझ्याबद्दलच्या बातम्यांत काहीही तथ्य नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिले. आपल्याबाबत सातत्याने दिल्या जात असलेल्या  या बातम्यांना काहीही आधार नाही. त्या जाणिवपूर्वक पसरवल्या जात आहेत. राज्यासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांवरील फोक दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे पवार म्हणाले. मी पक्षात राहीन याबाबत प्रतिज्ञापत्र करुन देऊ का असा प्रश्न त्यांनी  विचारला. 

मी भाजपसोबत जाण्याचे वृत्त चुकीचे आहे, आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेतल्याचे वृत्त देखील निराधार आहे.  बातम्या देताना थोडीशी सभ्यता पाळण्याची गरज आहे, असा सल्ला त्यांनी दिला. आमच्या सहनशीलतेचा अंत होऊ देऊ नका असा इशारा त्यांनी दिला. आम्ही आमची भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचे वकीलपत्र दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांनी घेऊ नये, मुखपत्राचे काम पाहावे, असा टोला त्यांनी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार  संजय राऊत यांना लगावला. 

सरकारविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी 

 अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून खारघर येथे मृत्यु पावलेल्यांच्या नातेवाईकांना २० लाख रुपये मदत देण्याची व सरकारविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. 

खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी लाखो संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला, त्यात निष्पाप १३ अनुयायांचा नाहक बळी गेला.ही दुर्दैवी घटना निसर्ग निर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे.या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार आहे.

या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा. तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २० लाख, तर उष्माघातामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोफत उपचारासह प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही