शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अविनाश जाधव विरोधात गुन्हा नोंदवा- सय्यद अली अश्रफ यांची मागणी


शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अविनाश जाधव विरोधात गुन्हा नोंदवा- सय्यद अली अश्रफ यांची मागणी 
लोकमानस प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव आपल्या राजकीय लाभासाठी वादग्रस्त वक्तव्ये करुन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जाधव यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून कारवाई करावी,  अशी मागणी राज्य अल्पसंख्यक आयोगाचे माजी सदस्य तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सय्यद अली अश्रफ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाण्याचे पोलीस आयुक्त व मुंब्रा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे. 
मुंब्रा मध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, जैन, बौद्ध आदी विविध धर्मांचे नागरिक गुण्यागोविंदाने राहत आहेत. धार्मिक मुद्द्यावरुन येथे कधीही तणाव झालेला नाही. गुढी पाडव्याच्या मिरवणुकीत मुस्लिम समाज सहभागी होतो तर ईद मिलादच्या मिरवणुकीत हिंदू व इतर धर्मीय बांधव सहभागी होतात. हे मुंब्राचे वैशिष्ट्य आहे.  मात्र अविनाश जाधव सारख्या प्रवृत्तीमुळे या सहकार्याला धोका निर्माण होण्याची भीती आहे. 
मुंब्रा येथील डोंगरावर दर्गाह आहे तर सोबत अनेक मंदिरे देखील आहेत. रेल्वे स्थानकासमोर अनेक वर्षे जुनी मशीद आहे तर बाजूलाच हनुमान मंदिर आहे. दोन्ही ठिकाणी आपापल्या धार्मिक बाबींचे आचरण केले जाते. वर्षानुवर्षे एकमेकांच्या धर्माचा आदर करुन दोन्ही समाज 
आनंदाने राहत आहे.  मात्र अविना जाधव सारख्या व्यक्तींमुळे वातावरण कलुषित होण्याची भीती नाकारता येत नाही.  दोन समाजात तेढ निर्माण करणारे व भांडण लावणारे वक्तव्य केलेल्या जाधव विरोधात गुन्हा नोंदवून अशा प्रवृत्तींचा वेळीच बीमोड करावा अशी मागणी सय्यद अली अश्रफ यांनी केली आहे. 
 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही