खासदार गिरीश बापट यांचे निधन

खासदार गिरीश बापट यांचे निधन 
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई - पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट 
यांचे बुधवारी निधन झाले.  त्यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून उपचार सुरु होते. ते 72 वर्षांचे होते. 
राज्य मंत्रिमंडळात त्यांनी कँबिनेट मंत्री पदी काम केले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बापट यांच्या कार्याचे कौतुक केले.  मंत्री, आमदार असताना व खासदार असताना बापट यांनी नेहमीच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली असे  ट्वीट मोदी यांनी केले.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापट यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.  बापट आजारी असताना त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व इतर राजकीय नेत्यांनी बापट यांची भेट घेतली होती.  

जमिनीशी नाळ असलेले राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपले

खा. गिरीश बापट यांना देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली


भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने जमिनीशी नाळ असलेले आणि राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. विकास हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता, अशी शोकसंवेदना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या शोकसंदेशात  फडणवीस म्हणतात की, पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. देशाच्या सार्वभौम सभागृहातील त्यांचा खासदार म्हणून प्रवेश हा तळागाळातून होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री आणि नंतर ते खासदार झाले. 2014 ते 2019 या सरकारच्या कार्यकाळात ते संसदीय कामकाज मंत्री होते. त्यांचा हजरजबाबीपणा आणि सर्व पक्षांत समन्वय, यामुळे कोणताही प्रसंग आला तरी योग्य मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती. पुण्याच्या समग्र विकासाचे चिंतन करीत असतानाच कामगार आणि शेतकरी हे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत असताना अमरावती जिल्ह्यात त्यांनी शेती सुद्धा केली. प्रत्येक कामात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या उभारणी करणार्‍या नेत्यांमध्ये ते अग्रणी होते. म्हणूनच जनतेचे त्यांना भरभरुन प्रेम मिळाले.

पुण्याच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. या आजारालाही त्यांनी लढवय्यासारखी झुंज दिली. यातून ते बाहेर येतील, अशी आशा होती. पण, आज ते आपल्याला सोडून गेले. आजारी असताना सुद्धा सातत्याने मतदारसंघावर त्यांचे लक्ष असायचे. त्यांचे निधन ही भारतीय जनता पक्षाची अपरिमित हानी आहे. एक उत्तम संसदपटू, उत्तम वक्ते आपल्यातून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकिय आणि सर्व कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदनेत म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही