शांतता आणि धार्मिक सलोख्यासाठी सांप्रदायिक शक्ती विरुद्ध प्रबोधन मोहीम राबवणार - हुसेन दलवाई

शांतता आणि धार्मिक सलोख्यासाठी सांप्रदायिक शक्ती विरुद्ध प्रबोधन मोहीम राबवणार - हुसेन दलवाई

लोकमानस प्रतिनिधी 

मुंबई-   धर्मांध,सांप्रदायिक शक्ती हिंदुत्वाच्या नावावर हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करुन राज्यातील धार्मिक सलोखा बिघडवीत आहेत. या देश विरोधी कृत्यात सरकारी यंत्रणा छुप्या पद्धतीने त्यांच्या पाठीमागे असून सामान्य अल्पसंख्यांक,मागासवर्गीय समाजामध्ये भीतीची आणि असुरक्षितेचे वातावरण निर्माण झालेले आहे. अल्पसंख्यांकाच्या मालमत्तेवर बुलडोझर चालवणे, गो-रक्षा,लव्ह जिहाद,लॅन्ड जिहाद अशी प्रकरणे जाणिवपूर्वक निर्माण करून जातीय व्देष निर्माण करत आहेत. व्देषमुलक वक्तव्य करणाऱ्या धर्मांध व्यक्तींच्या विरोधात प्रशासन व शासन बघ्याची भूमिका घेत आहेत. पुरोगामी महाराष्ट्राच्या गुण्या-गोविंदाने राहणाऱ्या समाजामध्ये दंगली घडवण्याचा मनसुबा असल्याचे दिसते. विशेषत: युवकांमध्ये चुकीची धारणा,चुकीचा इतिहास सामाजिक माध्यमातून प्रसारित केला जात आहे. या सर्वांच्या विरोधात आपण शांतता प्रिय आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी एकत्र येऊन सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घेतले पाहिजेत, असे आवाहन माजी खासदार हुसेन दलवाई यांनी इस्लाम जिमखानामुंबई येथे शांतता आणि सद्भावना मंच आयोजित राज्यव्यापी कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केले.



 ते पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी सर्व जाती -धर्मांना घेऊन एक आदर्श राज्य निर्माण केले. शिवाजी महाराजांना पेशव्यांनी सतत विरोध केला,त्या पेशव्यांना सहकार्य करणारेच आज शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास जनतेसमोर मांडून व्देष निर्माण करीत आहेत. जनतेपुढे महाराजांचा खरा इतिहास  आणून चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे. शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर,फातिमा शेख,संत तुकाराम महाराज,संत तुकडोजी महाराज,संत गाडगे महाराज,न्यायमूर्ती रानडे, नामदार गोपाळकृष्ण गोखले, यांनी महाराष्ट्राला पुरोगामी आणि विकासाची प्रेरणा दिली.त्यांच्या विचारांना संपवत धार्मिक उन्माद निर्माण केला जात असून ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

       बैठकीच्या अध्यक्षस्थानी पी.ए.ईनामदार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.ए.ईनामदार हे होते. प्रास्ताविक माजी आमदार युसूफ अब्राहनी यांनी केले.तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हसीब नदाफ यांनी केले. अध्यक्षीय भाषणात डॉ.पी.ए.ईनामदार म्हणाले की,पुण्यामध्ये आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीने शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंत्या रस्त्यावर येऊन उत्साहपूर्व वातावरण साजऱ्या केल्या. त्याचा सकारात्मक परिणाम पुण्यात झाला असून आमच्या येथे जातीय दंगली होऊ शकल्या नाहीत. समाजाने आधुनिक शिक्षणाची कास धरावी व आपली प्रगती साध्य करावी. धर्मांध प्रवृत्तीचा पाडाव करण्यासाठी शिक्षण आणि आर्थिक प्रगती गरजेची असते‌. युवकांना शिक्षणातून खरा इतिहास समजल्यानंतर ते धर्मांध ते कडे वळणार नाहीत असे मार्गदर्शन त्यांना यावेळी केले.

       मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणाले कीधर्मांध प्रवृत्तीच्या विरोधात विविध धर्मीय समाजात प्रबोधनात्मक कार्यक्रमाद्वारे कृती करण्याची आवश्यकता आहे. सर्वच पुरोगामी म्हणणारे राजकीय पक्ष या प्रश्नावर गंभीर नाहीत.त्यांनी भूमिका घेऊन या प्रश्नावर कृती करणे अत्यावश्यक आहे.अन्यथा त्यांचे अस्तित्वच धोक्यात येईल असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

     यावेळी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, अ‌.भा. माळी महासंघाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे, सुशिला मोराळे, लीला लिमये, फिरोज मिठीबोरवाला, ईक्बाल अन्सारी, आरीफभाई मन्सुरी,प्रा.प्रकाश सोनवणे,विश्वास ऊटगी, डॉ.‌ स्मिता शहापूरकर, मराठा खान, बबन कांबळे, ॲड. पल्लवी रेणके, रमेश कांबळे, डॉ.प्राचार्य फारुख शेख,मिली कौन्सिलचे अमिन शेख आदींनी आपले विचार यावेळी व्यक्त केले.

      जिल्हा पातळीवर शांतता सद्भावना परिषदांचे आयोजन करणे, तसेच युवकांची राज्यव्यापी कार्यशाळा आयोजित करणे,वाड्या-वस्त्यावर जाऊन युवक वर्गाचे प्रबोधन करणे, सामाजिक माध्यमातून सुरू झालेला दुषित प्रसार थांबविणे आदी कार्यक्रम हाती घेण्याचे सर्वानुमते ठेवण्यात आले.यावेळी राज्यभरातील विविध संघटनांचे प्रतिनिधी व विचारवंत उपस्थित होते.

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही