सभागृहातल्या मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधी पक्षनेते अजित पवारांचा रुद्रावतार, जमत नसेल तर मंत्र्यांनी पदे सोडा


सभागृहातल्या मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधी पक्षनेते अजित पवारांचा रुद्रावतार, 
जमत नसेल तर मंत्र्यांनी पदे सोडा

लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई : सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदस्य विविध आयुधांचा वापर करुन सभागृहात आपले प्रश्न मांडत असतात. मात्र सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यामुळे आज पुन्हा सहा पैकी केवळ एका लक्षवेधीवर सभागृहात चर्चा झाली, इतर लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की आली. मंत्र्यांच्या अनुपस्थितीचे प्रकार वारंवार होत असल्यामुळे संतापलेल्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा रुद्रावतार सभागृहाने अनुभवला. मंत्री व्हायला पुढे-पुढे करता मग सभागृहात का उपस्थित रहात नाही असा सवाल करुन मंत्र्यांना विधीमंडळाच्या कामकाजात कोणताच रस नाही, विधीमंडळाची गरीमा राखण्यात सत्ताधारी अपयशी ठरत असल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. तसेच संसदीय कार्यमंत्री सुध्दा सभागृहात कायमच अनुपस्थित असतात, त्यांना जमत नसेल तर त्यांनी पद सोडावे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेत्यांनी केला.

विरेोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. राज्यासाठी हे अधिवेश अत्यंत महत्वाचे आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी विधीमंडळ सभागृह व्यवस्थित चालण्यासाठी विरोधी पक्ष सर्वतोपरी सहकार्य करत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सभागृहाची प्रथा, परंपंरा मोडण्याचे काम सत्ताधाऱ्यांच्याकडून होत आहे. सदस्य विविध आयुधांचा वापर करुन सभागृहात प्रश्न मांडत असतात, मात्र त्याला उत्तर देण्यासाठी मंत्री सभागृहात उपस्थित राहतच नाहीत. हे वारंवार घडत आहे. त्यामुळे लक्षवेधी सूचना वारंवार पुढे ढकल्याची नामुष्की सभागृहावर येत आहे. हे सभागृह योग्य प्रकारे चालविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते संसदीय कार्यमंत्री स्वत: अनेकवेळा सभागृहात अनुपस्थित असतात, सभागृहाचे कामकाज करण्यासाठी समन्वय साधण्यात ते कमी पडत आहेत. त्यांना जमत नसेल तर त्यांनी पद खाली केले पाहिजे. मंत्रीपद मिळविण्यासाठी अनेक जण लॉबिंग करतात, पुढे-पुढे करतात मग सभागृहात कामकाजाच्यावेळी हे मंत्री अनुपस्थित का राहतात? मंत्र्यांना विधीमंडळात काम करण्यात कोणताही रस नाही, त्यांचा वेगळाच उद्योग सुरु असतो. तसेच सभागृहात अश्वासीत केलेल्या सर्व बैठका सुध्दा होत नाहीत, तरी त्याबैठका सुध्दा घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही