शालेय शिवचरित्र ज्ञान स्पर्धेत ५९५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग


शालेय शिवचरित्र ज्ञान स्पर्धेत ५९५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग 
लोकमानस प्रतिनिधी, 
मुंबई- मुंबईतील सर्वात मोठा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करणार्‍या शिवजयंती उत्सव समिती घाटकोपर तर्फे यंदा २७ फेब्रुवारी- मराठी भाषा गौरव दिनानिमित्त “शालेय शिवचरित्र ज्ञान स्पर्धा” या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत शिवकालीन इतिहासावर आधारित मराठी भाषेतील बहुपर्यायी १० प्रश्नांची लेखी परीक्षा घेण्यात आली असता स्पर्धेत घाटकोपरमधील विविध १४ शाळांमधील तब्बल ५९५० विद्यार्थ्यानी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
घाटकोपरस्थित पुणे विद्याभवन, सरस्वती विद्या मंदिर, अभ्युदय विद्यालय, ज्ञानप्रकाश विद्यालय, स्वामी शामानंद हायस्कूल, सनग्रेस इंग्लिश हायस्कूल, श्रीसाईनाथ शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यालय, कै.तुळशीराम सावते विद्यालय, जय महाराष्ट्र मनपा शाळा, महेश्वरी विद्यालय, विवेक विद्यालय, सरस्वती विद्या निकेतन, श्री व्यंकटेश विद्या निकेतन या विविध शाळेतील इयत्ता ५ वी ते ९ वी वर्गाच्या विद्यार्थ्यानी या स्पर्धेत सहभाग घेतला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यानी शालेय पुस्तकातील मर्यादित इतिहासापलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी विस्तृत वाचन करावे, त्यांच्या मनात शिवचरित्राविषयी जिज्ञासा निर्माण व्हावी हा प्रमुख उद्देश असल्याचे समितीचे अध्यक्ष कल्पेश बालघरे यांनी यावेळी सांगितले. 
या स्पर्धेतील सहभागी प्रत्येक शाळेतील एकूण ५ विजेते घोषित करण्यात येणार असून विजेत्यांना सन्मानचिन्हे, प्रशस्तीपत्रके आणि शिवचरित्र पुस्तिका भेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. शिवजन्मोत्सव २०२३ करीता समितीतर्फे ६ मार्च ते १० मार्च दरम्यान किल्ले शिवनेरी ते घाटकोपर शिवज्योत दौड, महाशिववंदना, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भव्य शिवरथ यात्रा अशा विविध उपक्रमांचे आयोजन यंदा करण्यात आलेले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही