ठाणे महापालिकेच्या दिव्यांग निधीवाटपात घोटाळा,अखिल भारतीय दिव्यांग सेनेचा आरोप

ठाणे महापालिकेच्या दिव्यांग निधीवाटपात घोटाळा,
अखिल भारतीय दिव्यांग सेनेचा आरोप
लोकमानस प्रतिनिधी - ठाणे 
 ठाणे महानगर पालिकेकडून करण्यात येणाऱ्या दिव्यांगांच्या अर्थसाह्य योजनेमध्ये पारदर्शकता येऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांकडून दिव्यांगांचे आधारकार्ड लिंक करण्यात येत नसून त्यातून आर्थिक घोटाळा करण्याचा उद्देश पालिका अधिकाऱ्यांचा असल्याचा आरोप अखिल भारतीय दिव्यांग सेनेने केला आहे.

 दरम्यान, दिव्यांगांची नोंदणी करण्याबाबतही ठाणे महानगर पालिकेकडून चालढकल करण्यात येत असल्याचा आरोप अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे मुख्य निमंत्रक  युसूफ  खान यांनी केला आहे.
खान यांनी या संदर्भात ठाणे पालिकेशी अनेकवेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्याकडे लक्ष दिले जात नसल्याने आता त्यांनी या संदर्भात थेट दिव्यांग आयुक्तांशी पत्रव्यवहार करुन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
खान यांनी दिलेल्या निवेदनानुसार,  ठाणे महानगर पालिकेकडून करण्यात येणार्या तरतुदीनुसार ठाणे पालिका परिक्षेत्रात राहणार्या दिव्यांगांना दरवर्षी केवळ 24 हजार रुपयांचा निधी देण्यात येत असतो. एवढ्या कमी निधीमधून दिव्यांगांना स्वत:चा उत्कर्ष साधता येत नाही. एकीकडे दिव्यांगांना सक्षम करण्याचे धोरण आखलेले असताना दुसरीकडे अशी अत्यल्प रक्कम देऊन दिव्यांगांची गणना अप्रत्यक्ष ‘भीक’ या संवर्गात केली जात असल्याचे दिव्यांगांचे मत तयार होत आहे. 

 ठाणे महानगर पालिका केवळ 24 हजार रुपये अनुदान देऊन दिव्यांगांना लाचार बनविण्याचे उद्योग करीत आहे. हे 24 हजार रुपये मिळविण्यासाठी अनेक बोगस दिव्यांगांकडून ठाणे पालिकेची फसवणूकही होत आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी जर दिव्यांगांचे आधारकार्ड योजनेशी लिंक केले तर त्याचा थेट फायदा ठाणे पालिकेलाच होणार आहे. मात्र, अनेक बोगस दिव्यांग हे राजकीय पक्षांशी निगडीत असल्याने त्यातून आर्थिक लाभ मिळवण्यासाठी हे अधिकारी जाणीवपूर्वक दिव्यांगांचे आधारकार्ड लिंक करीत नसल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, आधारकार्ड लिंक करण्याचे तसेच नव्याने दिव्यांगांची नोंदणी करण्याचे आदेश केंद्र तथा राज्य सरकारने दिलेले असून नवी मुंबई आणि पनवेल पालिकेत या आदेशाची अंमलबजावणी केली जात असतानाही ठाणे महानगर पालिकेकडून या आदेशांचाच भंग केला जात असल्याचेही खान यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
दरम्यान, आपण ही मागणी उदात्त हेतूने केलेली असतानाही काही अधिकार्यांखच्या अनुचित प्रकाराला आळा बसण्याची शक्यता असल्यानेच आधारकार्ड लिंक करण्याची कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप युसूफ खान यांनी केला आहे. तसेच, दिव्यांग  लाभार्थ्यांसाठी अर्जाचे वाटप करण्याची प्रक्रिया 6 फेब्रुवारीपासून सुरु करण्यात आलेली आहे. मात्र, ही प्रक्रिया राबविताना आपण केलेल्या मागण्यांच्या विचारही प्रशासनाने केलेला नाही. त्यामुळे या सर्व प्रक्रियेतच घोटाळा झाला असून त्याची चौकशी करुन अहवाल सादर करावा अन्यथा, दिव्यांगांच्या वतीने बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मोहम्मद युसूफ खान यांनी दिला आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही