मुंबई शहर ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन

 

मुंबई शहर ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन 


प्रतिनिधी - मुंबई  : वाचाल तर वाचाल, ग्रंथ हेच गुरू, ग्रंथ देवो भव, ग्रंथ आमुचे साथी- ग्रंथ आमुचे हाती, ग्रंथ उजळती-अज्ञानाच्या अंधाऱ्याच्या राती, वाचन संस्कृती घरोघरी- तिथे फुलती ज्ञान पंढरी, पुस्तकांशी करता मैत्री- ज्ञानाची मिळते खात्री, असा संदेश देणारी ग्रंथ दिंडी काढत आजपासून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई शहर व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पूर्व), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय मुंबई शहर ग्रंथोत्सव 2022 ला सुरूवात झाली.

शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त काढण्यात आलेल्या ग्रंथ दिंडीत अपर पोलिस आयुक्त संजय दराडे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी लेझीम नृत्य सादर केले.

यावेळी लेखक डॉ.अच्युत गोडबोले, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील, ग्रंथालय संचालनालयाचे संचालक दत्तात्रय क्षीरसागर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे, शिक्षण निरीक्षक देविदास महाजन उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री केसरकर म्हणाले, साहित्यात जीवन बदलण्याची ताकद आहे. मुलांमध्ये शालेय जीवनातच वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून रीड इंडियाच्या धर्तीवर रीड महाराष्ट्र चळवळ सुरू करण्यात येईल. मराठी भाषा, संस्कृती संवर्धनासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम नियमितपणे आयोजित करावेत. वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी ग्रंथालय आणि शाळा यांच्यात समन्वय साधण्यात येईल. मुंबई ग्रंथालय मराठी भाषेचे वैभव असून त्यासाठी मराठी भाषा विभाग सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.

 गोडबोले यांनी सांगितले की, साहित्यातून इतिहास आणि भूगोलाचे आकलन होते. माणस अनुभवायला मिळतात. या साहित्यात समाजाचे प्रतिबिंब उमटले पाहिजे. साहित्य ज्ञानवर्धक असावे. त्याबरोबरच ते मानवतावाद, विवेकवाद, विज्ञानवाद आणि समतेचा मार्ग दाखविणारे असावे. वाचताना कुतूहल निर्माण झाले पाहिजे. त्यासाठी मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यात ग्रंथालयांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

सचिव पाटील यांनी सांगितले की, जीवनात पुस्तकांचे महत्त्व अतुलनीय आहे. पुस्तके नेहमीच सोबत करतात. पुस्तकांच्या वाचनाने व्यक्तिमत्व समृद्ध होते.

ग्रंथालय संचालक  क्षीरसागर यांनी सांगितले की, राज्यातील प्रत्येक गावांत वाचन संस्कृती पोहोचावी, वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी ग्रंथोत्सव उपक्रम उपयुक्त आहे.  ग्रंथालयाच्या कार्याध्यक्ष शीतल करदेकर यांनी आभार व्यक्त केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. काकड यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वाचक, ग्रंथप्रेमी, विक्रेते, प्रकाशक उपस्थित होते.  पालकमंत्री  केसरकर यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी ग्रंथ प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच विक्रेत्यांशी संवाद साधत ग्रंथ खरेदी केली.

गुरुवारी सकाळी मराठीतील दुर्मिळ ग्रंथांच्या प्रदर्शनाचे दर्शनिका विभागाचे सचिव तथा कार्यकारी संपादक डॉ. दिलीप बलसेकर यांच्या हस्ते करण्यात आले.  सकाळी ११ वाजता भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ विद्यार्थ्यांना ७५ ग्रंथांचे वितरण माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते करण्होयात आले.  सकाळी ११.३० ते १ या कालावधीत ‘वाचन संस्कृती : काल, आज आणि उद्या’ याविषयावर पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील ग्रंथालय व माहिती शास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार यांचे व्याख्यान होईल. दुपारी २.३० ते ४ या कालावधीत ‘ग्रंथोत्सव का व कशासाठी’ याविषयावरील परिसंवादात ठाणेचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील, मुंबई उपनगरचे संजय बनसोड, चेतना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्चच्या ग्रंथपाल डॉ. सिद्धी जगदाळे, माहीम सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यवाह सुषमा जोशी सहभागी झाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही