कुर्ला परिसरात अंमली पदार्थ विक्री जोरात, पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

कुर्ला परिसरात अंमली पदार्थ विक्री जोरात, 
पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

मुंबई -:
   कुर्ला येथे अंमली पदार्थ विक्री मोठ्या प्रमाणात सुरु असून पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या परिसरात अंमली पदार्थ विक्रीमुळे तरुणाई त्याच्या विळख्यात सापडली आहे. 
या परिसरात ड्रग्ज माफियांनी आपले बस्तान मांडले असून राजरोजपणे अंमली पदार्थाची विक्री केली जात आहे.  ड्रग्ज माफियांची नावे व विक्रीच्या अड्ड्यांसह अनेक तक्रारी देऊनही कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अँड. कमलेश हडकर यांनी केला आहे. 
     अँड हडकर यांनी मागील दोन वर्षांपासून कुर्ला परिसरातील ड्रग्ज माफिया व जुगाराच्या अड्ड्यांसंदर्भात पोलीस आयुक्तांपासून स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.  मात्र त्याची कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

 हडकर म्हणाले, कुर्ला परिसर सध्या उडता पंजाब झाला असून अंमली पदार्थ विक्रीचे माहेरघर या ठिकाणी बनले आहे. कुर्ल्यातील अनेक झोपडपट्टी भागात अंमली पदार्थ विक्रीचे अड्डे असून मुंबईच्या अनेक भागातून नशेडी खरेदीसाठी येतात. या ठिकाणचा तरुण पूर्णतः व्यसनाच्या अधीन गेला आहे. व्यसन करण्यासाठी पैसे नसल्याने बहुतांशी तरुण लूटमार करत असल्याचा आरोप देखील अँड. हडकर यांनी केला आहे. 

कुर्ला पश्चिम येथील उर्दू बाग लेन, मायकल कंपाउंड, उनवाला कंपाउंड समोर, बाबू कसाई गल्लीच्या शेवटी, रेल्वे पटरी जवळ, राम बच्चन तबेला सी ब्लॉक जवळ, एल. आय. जी. कॉलनी, एम.आय.जी. कॉलनी शेज़ारो, ब्राम्हण वाडी मध्ये जिम समोर, कुर्ला नर्सिंग होमच्या शेजारील पार्किंग मध्ये, अर्पण हॉस्पिटलच्या पलीकडे स.गो. बर्वे मार्गावर, न्यू मॉडेल सिनेमा ट्रान्सीट कॅम्प शेजारी, बुद्ध कॉलनी जवळ, बालाजी मंदिर गल्लीच्या शेवटी, रस्सीवाला काम्पाऊंडसमोर, पाईप रोड, भारती नगर, कोहिनुर सिटी जवळ, गावदेवी मंदिराजवळ, वाडिया इस्टेट, क्रांती नगर, हालाव पूल, ख्रिश्चन गाव, इंदिरा नगर भागात ड्रग्ज माफिया स्थानिक गुंडांच्या मदतीने ड्रग्जचा व्यापार व मटका किंग जुगाराचा अड्डा चालवीत असल्याचा आरोप अँड. हडकर यांनी केला आहे. या ठिकाणचे ड्रग्ज माफिया अल्पवयीन मुलांना आमिषे दाखवून अंमली पदार्थ विक्रीसाठी त्यांचा वापर करत आहेत. झटपट पैसे कमविण्याच्या नादात अल्पवयीन मुले ड्रग्ज माफियांची कामे करत आहेत. ड्रग्जच्या व्यवसायपप्रमाणे कुर्ल्यातील नशेमन हॉटेल शेजारी, तकिया वार्ड, बुद्ध कॉलनी, वाडिया इस्टेट, ख्रिश्चन गाव, क्रांती नगर भागात कल्याण मटका व इतर मटक्याचे बुकिंग केले जाते. तर पत्त्यांचे क्लब देखील जोरात सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 
      या ठिकाणच्या माफियांच्या नावांची यादी स्थानिक पोलीस ठाण्यासह पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत दिली असून मागील दोन वर्षांपासून त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप  हडकर यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेऊन कुर्ला परिसरातील ड्रग्ज माफियांवर कारवाई करावी असे आवाहन हडकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही